सचिनचा रेकॉर्ड मोडताना विराटने मनगटावर बांधलं होतं हे डिव्हाइस, फिचर्स जाणून हैराण व्हाल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या हातावर तुम्ही एक खास बँड पाहिला आहे. या बँडवर तुम्हाला कोणताही डिस्प्ले दिसत नाही. विराट वापर करत असणारा हा बँड जगातील अनेक टॉप खेळाडू वापरतात. हा बँड इतका खास का आहे? हे जाणून घ्या...  

शिवराज यादव | Updated: Nov 16, 2023, 05:21 PM IST
सचिनचा रेकॉर्ड मोडताना विराटने मनगटावर बांधलं होतं हे डिव्हाइस, फिचर्स जाणून हैराण व्हाल title=

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सेमी-फायनलमध्ये विराट कोहलीने आपल्या 50 व्या शतकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान या सामन्यात विराटने आपल्या हातावर घातलेल्या एका बँडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा एक फिटनेस बँड आहे. पण इतर कोणत्याही फिटनेस बँड किंवा ट्रॅकरपेक्षा पूर्ण वेगळा आहे. हा फिटनेस बँड Whoop ब्रँडचा आहे, जो अद्याप भारतात लाँच झालेला नाही.

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड्स आहेत. पण हे त्या सर्वांपेक्षा वेगळं आहे. यामध्ये डिस्प्ले नसून, तो चार्जही वेगळ्या पद्धतीने होते. याचे फिचर्स समजल्यानंतर तुम्हीदेखील हैराण व्हाल. 

फक्त विराटच नाही तर भारतीय संघातील इतर खेळाडूही या फिटनेस बँडचा वापर करतात. सध्या संपूर्ण जग अॅपल आणि इतर स्मार्टवॉचचे चाहतं असताना भारतीय खेळाडू हा फिटनेस बँड का वापरतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर मग जाणून घ्या...

Whoop बद्दल जाणून घ्या...

2015 मध्ये या ब्रँडची सुरुवात झाली. विल अहमद याचे सीईओ आणि फाऊंडर आहेत. कंपनीने 2015 मध्ये आपलं पहिलं डिव्हाइस Whoop 1.0 लाँच केलं होतं. 2021 मध्ये कंपनीने याचं 4.0 व्हर्जन लाँच केलं आहे. नुकतंच कंपनीने OpenAI सह भागीदारी केली आहे. याअंतर्गत Whoop Coach ला लाँच करण्यात आलं. 

Whoop चा दावा आहे की, कंपनीच्या बँडकडून ट्रॅक करण्यात आलेला हेल्थ आणि फिटनेस डेटा 99 टक्के अचूक असतो. हा बँड फक्त ट्रॅक करत नाही, तर रिअल टाइम स्ट्रेस स्कोअरही सांगतो. हे एक रिकव्हरी फोकस्ड ट्रॅकर आहे जे खेळाडूंना ते खेळण्यासाठी कितपत तयार आहेत, तसंच किती सुधारणेला वाव आहे याची माहिती देतं. 

उदाहरण द्यायचं झाल्यास यामध्ये एक स्लीप कोच फिचर आहे जे तुम्ही किती तास झोपल्यास तुमचं शऱीर चांगली कामगिरी करेल हे सांगतं. हा फिटनेस बँड इतर ट्रॅकरप्रमाणे तुम्ही किती तास झोपलं पाहिजे तसंच किती तास झोपलात इतकंच सांगत नाही. तर हे तुमच्या शरिराप्रमाणे आज तुम्ही किती तास झोपल्यास शरीर 100 टक्के कामगिरी करेल याची माहिती देतं. 

हा फिटनेस बँड सब्स्क्रिप्शन आधारित आहे. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला महिन्याला पैसे भरावे लागतात. Whoop 4.0 च्या मदतीने तुम्ही ऑक्सिजन लेव्हल, कॅलरी यासारख्या गोष्टीही ट्रॅक करु शकता. 

 

किंमत किती? 

या फिटनेस बँडमध्ये कोणताही डिस्प्ले नाही. तुम्ही 24 तास तो घालू शकता. तुम्ही याच्या मदतीने आपली झोपही ट्रॅक करु शकता. संपूर्ण दिवसभरात खर्च झालेली ऊर्जा आणि सकाळी तुम्ही किती रिकव्हर केली याचा डेटाही यात मिळतो. 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह तुम्ही 239 डॉलर्समध्ये हा बँड खरेदी करु शकता. भारतात हा बँड उपलब्ध नाही. 

याचं महिन्याचं सबस्क्रिप्शन 30 डॉलर आहे. सदस्यांना Whoop अॅपचा अॅक्सेसही मिळतो. तुम्ही डेस्कटॉप, iOS आणि अँड्रॉइडव याचा वापर करु शकता.