दुबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. जगातल्या सगळ्याच क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. असं असलं तरी भारतीय टीम टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.ऑक्टोबर २०१६ नंतर टीम इंडिया पहिल्यांदाच टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरून घसरली आहे.
आयसीसी क्रमवारीच्या २०१६-१७ च्या रेकॉर्ड अपडेटमुळे क्रमवारीमध्ये हे बदल झाले आहेत. या अपडेटमध्ये मे २०१९ सालापासून खेळवण्यात आलेल्या टेस्ट मॅचना १०० टक्के आणि त्याआधी २ वर्ष खेळवण्यात आलेल्या टेस्ट मॅचना ५० टक्के गणण्यात आलं आहे. २०१६-१७ या मोसमात भारताने १२ टेस्ट मॅच जिंकल्या होत्या, तर १ टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता.
India displaced from top in Tests for the first time since October 2016.
Pakistan slip in T20I rankings after 27 months as No.1.Details https://t.co/gfBjYsdFMW
— ICC (@ICC) May 1, 2020
टी-२० क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. टी-२० क्रमवारीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला टी-२०मध्ये पहिला क्रमांक गाठता आला आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा टी-२० क्रिकेटमधला पहिला क्रमांक घेतला आहे. पाकिस्तानला २७ आठवड्यानंतर पहिल्यांदाच टी-२०मधून पहिला क्रमांक गमवावा लागला आहे. वनडे क्रमवारीत इंग्लंडची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रमवारीत भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टेस्ट क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे ११६ पॉईंट्स, न्यूझीलंडचे ११५ पॉईंट्स आणि टीम इंडियाचे ११४ पॉईंट्स आहेत. टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर गेली असली तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ टीम सहभागी झाल्या आहेत. या सगळ्या टीम ६ टेस्ट सीरिज खेळणार आहेत. या ६ सीरिजनंतप पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असणाऱ्या २ टीम लॉर्ड्सच्या मैदानात फायनल खेळणार आहेत.