टी-२० क्रमवारीत विराटची घसरण, राहुल त्याच स्थानावर

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे.

Updated: Feb 17, 2020, 06:03 PM IST
टी-२० क्रमवारीत विराटची घसरण, राहुल त्याच स्थानावर title=

दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे. तर केएल राहुल दुसऱ्या स्थानावर कायम आहे. विराट कोहली क्रमवारीमध्ये १०व्या स्थानावर फेकला गेला आहे. सोमवारी आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० सीरिजचा परिणाम दिसत आहे.

केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये शानदार कामगिरी केली होती, त्यामुळे भारताने सीरिज ५-०ने जिंकली होती. राहुलने टी-२० सीरिजमध्ये २२४ रन केले होते, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं. तर विराट कोहलीला या सीरिजमध्ये फक्त १०५ रनच करता आले होते.

विराट कोहलीला पिछाडीवर टाकण्यात इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनची कामगिरी कारणीभूत ठरली. मॉर्गनने ३ मॅचच्या सीरिजमध्ये १३६ रन केले. मॉर्गनच्या या कामगिरीमुळे इंग्लंडने सीरिज २-१ने जिंकली. मॉर्गनने विराटसोबतच रोहित शर्मालाही पिछाडीवर टाकत नववा क्रमांक गाठला आहे. तर रोहित शर्मा ११व्या क्रमांकावर आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डि कॉकने १० स्थानांची उडी घेत, १६वा क्रमांकावर मजल मारली आहे. क्विंटन डि कॉकने या सीरिजमध्ये ३१, ६५ आणि ३५ रन केले.

पाकिस्तानचा बाबर आजम बॅट्समनच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. केएल राहुल दुसऱ्या, एरॉन फिंच तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीत अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या क्रमांकावर आणि ऑल राऊंडरच्या यादीत अफगाणिस्तानचाच मोहम्मद नबी पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह टॉप-१० बॉलरच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. बुमराह बॉलरच्या क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. 

टीम क्रमवारीमध्ये इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आणि दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. भारतीय टीम या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.