कोहलीचं अव्वल स्थान या युवा खेळाडूमुळे धोक्यात

२०२० सालच्या पहिल्या टेस्ट क्रमवारीची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jan 9, 2020, 12:10 PM IST
कोहलीचं अव्वल स्थान या युवा खेळाडूमुळे धोक्यात title=

दुबई : २०२० सालच्या पहिल्या टेस्ट क्रमवारीची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन जोरदार आघाडी घेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार कामगिरीमुळे मार्नस लॅबुशेन पहिल्या क्रमांकाच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असला तरी मार्नस लॅबुशेनमुळे विराटचं स्थान धोक्यात येऊ शकतं.

टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर तर मार्नस लॅबुशेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. लॅबुशेनने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये २१५ आणि ५९ रनची खेळी केली होती. २५ वर्षांच्या लॅबुशेनने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ५४९ रन केले. २०२० सालचं पहिलं द्विशतक मार्नस लॅबुशेनने झळकावलं आहे.

विराट कोहली ९२८ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्टिव्हन स्मिथ ९११ पॉईंट्ससह दुसऱ्या आणि मार्नस लॅबुशेन ८२७ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ८१४ पॉईंट्ससह चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर ७९३ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीशिवाय चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोन भारतीय खेळाडू टॉप-१०मध्ये आहेत. पण या दोन्ही खेळाडूंची क्रमवारी मात्र घसरली आहे. पुजारा सहाव्या आणि अजिंक्य नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्स ५ स्थान उडी मारून १०व्या क्रमांकावर आला आहे. बाबर आजम सातव्या आणि जो रुट आठव्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाला पुढच्या काही महिन्यांमध्ये टेस्ट सीरिज खेळायची नाही, तर भारत न्यूझीलंडविरुद्ध २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये विराटला त्याचे पॉईंट्स वाढवण्याची संधी आहे. 

बॉलरच्या यादीत पॅट कमिन्स पहिल्या आणि न्यूझीलंडचा निल वॅगनर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कागिसो रबाडा तिसऱ्या आणि मिचेल स्टार्क पाचव्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीत जसप्रीत बुमराह सहाव्या, आर अश्विन नवव्या आणि मोहम्मद शमी १०व्या क्रमांकावर आहेत.

टीम क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका चौथ्या, इंग्लंड पाचव्या, श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या, बांगलादेश नवव्या, अफगाणिस्तान १०व्या, झिम्बाब्वे ११व्या आणि आयर्लंड १२व्या क्रमांकावर आहे.