ICC ODI World Cup 2023 Captains Meet : क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलंय. गुरुवारी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यान (England vs New Zealand) सलामीच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेच्या एकदिवसीय आधी सहभागी सर्व दहा संघांचे कर्णधार एकमेकांना भेटले (Captains Meet). त्यानंतर प्रत्येक कर्णधाराने स्पर्धेबाबात आपलं मनोगत व्यक्त केलं. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने हा आपला सन्मान असल्याचं म्हटलंय. तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) केलेल्या एका वक्तव्याने करोडो भारतीयांची मनं जिंकली.
रोहित शर्मा काय म्हणाला
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 2023 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणं हा आपला सन्मान असल्याचं म्हटलं आहे. घरच्या मैदानावर घरच्या लोकांसमोर खेळताना संघावर दबाव आहे पण करोडो चाहत्यांची निराशा होऊ देणार नाही, असं रोहित शर्माने म्हटलंय. भारतीय क्रिकेट संघाने चांगली तयारी केली आहे, याचा नक्कीच फायदा होईल असंही रोहित शर्माने सांगितलं. प्रत्येक मॅच आमच्यासाठी महत्त्वाची असेल. पावसामुळे सराव सामने रद्द झाल्याने फारसा फरक पडणार नसल्याचंही रोहित शर्माने म्हटलं आहे.
बाबर आझम भारताच्या प्रेमात
पत्रकार परिषेदत पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने केलेल्या वक्तव्याने करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. भारतात आल्यावर चांगलं वाटतंय, गेल्या आठवडाभरापासून भारतात आहे, पण परक्या देशात असल्याचं जराही वाटत नाही असं बाबरने म्हटलंय. आम्हाला वाटलं भारतात आम्ही एकटे पडू, पण विमानतळपासासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा आम्हाला भरपूर प्रेम मिळालं असं बाबरने म्हटलंय, विशेष म्हणजे बाबर आझमने हैदराबादी बिर्यानीचं तोंडभरून कौतुक केलं. हैदराबादी बिर्यानी संघातल्या सर्व खेळाडूंना आवडल्याचं त्याने सांगितलं. विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ सज्ज असून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा त्याने व्यक्त केली.
5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा कुंभमेळा
गुरुवारपासून म्हणजे पाच ऑक्टोबरपासून भारतात आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल आणि पुढचे 45 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा भरणार आहे. दहा संघांमध्ये तब्बल 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक संघ इतर नऊ संघांबरोबर खेळले. 19 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होईल. भारतात चेन्नई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, धरमशाला, पुणे, लखनऊ, नुंबई, कोलकाता, बंगळुरु आणि अहमदाबादमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत.
जेतेपदाचा दावेदार कोण?
विश्वचषकाच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला सर्वात मोठा दावेदार मानलं जात आहे. घरचं मैदान आणि घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा टीम इंडियाला मिळणार आहे. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत.