ICC Chairman : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांचा कार्यकाळ वाढणार नाहीये. ते 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष आहेत. आता या पदासाठी सौरव गांगुलीचं नाव चर्चेत आहे. सौरव गांगुली (saurav ganguly) सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. पण सौरव गांगुली यांच्यासह जय शाह (Jay Shah) यांना देखील आयसीसीचा अध्यक्ष होण्याची इच्छा आहे. (Sourav Ganguly and Jay Shah FACE-OFF for ICC Chairman Post)
सौरव गांगुली आणि जय शाह या दोघांनाही आयसीसीचे अध्यक्ष व्हायचे आहे, असा दावा 'द टेलिग्राफ'मधील वृत्तांत करण्यात आला आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली आणि जय शाह आमने-सामने असू शकतात. यापैकी कोणीही ICC चे अध्यक्ष बनले तर ते हे पद भूषवणारे पाचवे भारतीय असतील. ICC अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो आणि तो सहा वर्षांपेक्षा जास्त वाढवता येत नाही.
आतापर्यंत चार भारतीय आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. या पदावर पोहोचणारे जगमोहन दालमिया (Jagmohan Dalmiya) हे पहिले भारतीय होते. त्यांचा कार्यकाळ (1997-2000) पर्यंत होता. शरद पवार (2010-2012), एन श्रीनिवासन (2014-2015) आणि शशांक मनोहर (2015-2020) यांनी हे पद भूषवले आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कल यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकते. 2023 चा विश्वचषक भारतात होणार आहे. याआधी बीसीसीआयला आयसीसीमध्ये आपले वर्चस्व वाढवायचे आहे.
मोहम्मद अझरुद्दीननंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर त्याने टीम इंडियाला नव्या उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया परदेशात जिंकायला शिकली, पण त्याच्या नेतृत्वाखाली 2003 च्या विश्वचषकात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्याने भारतासाठी 113 कसोटी सामन्यांमध्ये 7212 धावा आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते. दुसरीकडे जय शाह देखील इच्छूक आहेत. ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे पुत्र आहेत आणि ते सध्या बीसीसीआयचे सचिव (bcci secretary) आहेत.