'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा

Gautam Gambhir About World Cup Match: गौतम गंभीरने एका मुलाखतीमध्ये या सामन्यासंदर्भात खुलासा केला आहे. गंभीरने आपल्याला हा सामना आजही जसाच्या तसा आठवतो असं सांगत नेमकं काय घडलेलं हे सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 3, 2024, 03:32 PM IST
'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा title=
गंभीरने स्वत: केला खुलासा

Gautam Gambhir About World Cup Match: भारतीय संघाचा संभाव्य प्रशिक्षक म्हणून चर्चेत असलेल्या गौतम गंभीरने एक मोठा खुलासा केला आहे. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अवघ्या एका धावेने पराभूत झाला होता, अशी आठवण सांगताना गंभीरने यामधूनच आपल्याला भारतासाठी खेळून वर्ल्डकप जिंकण्याचा प्रेरणा मिळाली असं म्हटलं आहे. भारताचा हा पराभव झाल्यानंतर आपण रात्रभर धाय मोकलून रडत होतो, असंही गंभीरने या कटू आठवणीबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे.

त्या सामन्यात घडलेलं काय?

गंभीरने ज्या सामन्याबद्दल भाष्य केलं आहे त्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला 47 ओव्हरमध्ये 236 धावांचं नवं टार्गेट देण्यात आलं होतं. शेवटच्या बॉलवर भारताला चार धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉने शेवटच्या बॉलवर जवागल श्रीनाथचा झेल सोडला. मात्र सामना अनिर्णित राखण्यासाठी तिसरी धाव घेताना वेंटपथी राजू हा अवघ्या काही इंचांनी क्रिजपासून दूर राहिला आणि धावबाद झाला. हा सामना भारताने गमावला होता. याच सामन्यासंदर्भात 'स्पोर्ट्सकिडा'ला 'एसके मॅच की बात' या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरने भाष्य केलं आहे.

मी रात्रभर रडलो

"हा सामना पाहिल्यानंतर मला भारतासाठी आपण वर्ल्ड कप जिंकायला हवा असं वाटलं. मला भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचा होता. मला आजही 1992 साली झालेला ब्रिसबेनमधील भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सामना आठवतो. या सामन्यात भारत एका धावाने पराभूत झाला होता. मला आठवतंय की आजही मी संपूर्ण रात्रभर रडत होतो. मी यापूर्वी कधीही असा ढसाढसा रडलो नव्हतो आणि त्यानंतर मी पुन्हा कधीच तसा रडलो नाही. मी एवढा का रडलो मला ठाऊक नाही," असं गंभीरने या सामन्याबद्दलची आठवण सांगताना म्हटलं. त्यावेळी आपण केलेला निश्चिय आपण 2011 साली वर्ल्ड कप जिंकून पूर्ण केला," असं गंभीर म्हणाला.

मी रडत बसलो नाही

"मी त्यावेळेस 11 वर्षांचा होता. मी संपूर्ण रात्रभर रडलो. त्यावेळेस मी म्हणालो होतो की मला भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मला भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यायचा आहे. मी 1992 साली केलेलं ते विधान 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सत्यात उतरवू शकलो. त्या सामन्याच्या आधी आणि नंतर मी नाराज होतो. मात्र मी असा रडत बसलो नाही," असं गंभीरने म्हटलं. 

मी पहाटे सामने पाहायचो

"वेंकटपती राजू धावबाद झाल्याचं मला आठवतंय. भारत एका धावाने सामना हारला होता. त्यावेळेस सामने सकाळी लवकर दाखवले जायचे. मी पहाटे पाच वाजता उठून सामने पाहायचो. मात्र त्या सामन्यानंतर मी एवढा दुखी कधीच झालो नव्हतो," असं गंभीर म्हणाला. गंभीरने 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 122 बॉलमध्ये 97 धावा केल्या होत्या. गंभीरने धोनीबरोबर 109 धावांची पार्टनरशीप केली होती. भारताने 275 धावांचं टार्गेट पूर्ण केलं होतं. भारताने हा सामना सहा विकेट्स आणि 10 बॉल राखून जिंकला होता.