'ही' गोष्ट विराटला आयती मिळाली, कष्ट धोनीने घेतले अन्...; इशांत शर्मा स्पष्टच बोलला

MS Dhoni And Virat Kohli Captaincy: महेंद्र सिंह धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 30, 2023, 09:57 AM IST
'ही' गोष्ट विराटला आयती मिळाली, कष्ट धोनीने घेतले अन्...; इशांत शर्मा स्पष्टच बोलला title=
एका मुलाखतीमध्ये बोलताना इशांतचं विधान

MS Dhoni And Virat Kohli Captaincy: भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. धोनीकडून गोलंदाजाचं संपूर्ण पॅकेजच कोहलीला कर्णधार म्हणून आयतं मिळाल्याचं इशांत शर्मा म्हणाला आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीदरम्यान गोलंदाजांना पैलू पाडण्याचं काम केलं. त्यानंतर धोनीने त्याचा उत्तराधिकारी ठरलेल्या विराट कोहलीला गोलंदाजांचं एक परिपूर्ण पॅकेजच सोपवलं होतं, असं इशांत शर्माने म्हटलं आहे. 2 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार राहिलेला धोनी 2007 ते 2017 दरम्यान मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करत होता. 2008 पासून 2014 दरम्यान धोनी कसोटी क्रिकेटमध्येही संघाचा कर्णधार. धोनीनंतर कोहलीकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

धोनीची तुलनाच होऊ शकत नाही

धोनी कर्णधार असताना मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजांची पदार्पण केलं. इशांतने जियो सिनेमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "विराट जेव्हा कर्णधार झाला तेव्हा गोलंदाजीचं युनीट पूर्णपणे सेट झालं होतं. जेव्हा आम्ही माही भाईच्या (धोनीच्या) नेतृत्वाखाली खेळत होतो तेव्हा संघात बरेच बदल होत होते. त्यावेळेस शामी आणि उमेश नवे खेळाडू होते. केवळ मीच तसा आधीपासून खेळणारा असल्याने सातत्याने खेळत होतो बाकी सर्वांना आलटून पालटून खेळवलं जायचं. भूवनेश्वर कुमारही तसा नवखा खेळाडूच होता. संवाद साधण्याचा विचार केल्यास धोनीची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही," असं मत व्यक्त केलं. 

धोनीने एवढ्या गोलंदाजांचा पैलू पाडले

"धोनीने गोलंदाजांना पैलू पाडले आणि विराटकडे ते सोपवले. शमी आणि उमेश काळानुरुप वेगळ्या शैलीचे गोलंदाज झाले. त्यानंतर जसप्रीत आला. त्यामुळे विराटला गोलंदाजीचं संपूर्ण पॅकेजच मिळालं," असं इशांत शर्माने म्हटलं आहे. कर्णधार कोहली सुद्धा प्रत्येकामधील गुण ओळखायचा. "त्याने केलेली सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे तो सर्वांमधील गुण ओळखायचा. तो प्रत्येकाबरोबर त्यांच्या गुणांबद्दल बोलायचा," असंही इशांत म्हणाला.

कोहलीने प्रत्येक खेळाडूसाठी भूमिका निश्चित केली

कोहलीने कशाप्रकारे प्रत्येक गोलंदाजासाठी काही ठराविक भूमिका निश्चित केल्या याबद्दलही इशांतने भाष्य केलं. कोहली प्रत्येकाला वेगवेगळा सल्ला द्यायच्या. ज्या माध्यमातून गोलंदाजांना त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत व्हायची. खास करुन लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये हे फार जाणवायचं, असं इशांत म्हणाला. मात्र मध्यंतरी कोहलीने तडकाफडकी आपलं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.