Hardik Pandya: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 रन्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून चाहत्यांवर आनंदाचा वर्षाव केला. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची टीम केवळ 169 रन्स करू शकली. या विजयाने भारताचा वर्ल्डकपमधील दुष्काळ तब्बल 13 वर्षांनंतर संपला. या विजयासह विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि पुढील पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.
दरम्यान या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला.
या विजयानंतर हार्दिक पंड्याने त्याचं दुःख सर्वांसोबत शेअर केलं. यावेळी हार्दिक पंड्या म्हणाला, ‘हा विजय आमच्यासाठी खूप खास आहे. मी खूप भावुक झालो आहे. आम्ही खूप प्रयत्न करत होतो पण काहीच काम योग्यरित्या होत नव्हते. पण आज संपूर्ण देशाला जे हवं होतं ते आपण साध्य केलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे शेवटचे गेले सहा महिने कसे गेले याबाबत मी एक शब्दही बोललो नाही. मेहनत करत राहिलो तर एक दिवस पुन्हा चमकेन हे मला माहीत होतं.
'यावेळी माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, हार्दिक पांड्याला कोणीही ओळखत नाही पण प्रत्येकजण माझ्याबद्दल बोलतो. मी नेहमी जीवनात परिस्थितीला सामोरं जाण्यावर विश्वास ठेवतो, असं भावनिक होत हार्दिक पंड्या विजयानंतर म्हणाला. तो पुढे म्हणाला, या प्रकारचा प्रसंग आणखी खास आहे. आमचा नेहमीच असा विश्वास आहे की, केवळ योजना योग्यरित्या अंमलात आणणं, सामन्यादरम्यान शांत राहणे आणि दडपणाखाली न येणं यामुळेच विजय मिळतो. मुळात याचं संपूर्ण श्रेय बुमराह आणि इतर गोलंदाजांना जातं. या गोलंदाजांनी शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. मला प्रत्येक बॉलवर माझे 100 टक्के द्यायचे होते. मी नेहमी दडपणाखाली खेळण्याचा आनंद घेतो. मी राहुल द्रविडसाठी सर्वात आनंदी आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल, क्रिकेटर हार्दिक पंड्या म्हणाला, '2026 ला अजून बराच वेळ आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज या विजयासाठी पूर्णपणे पात्र होते. इतकी वर्षे त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव अद्भुत होता. आण्ही सर्व त्यांना मिस करू, असंही हार्दिकने सांगितलंय.