IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!

Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Feb 18, 2024, 05:01 PM IST
IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत! title=
Team india's historical wins

Team india's historical wins in Test cricket : राजकोटच्या मैदानावर खेळल्या (Rajkot Test) गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघाचा 434 धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय (Highest victory margin in Test) ठरला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

टीम इंडियाचा पहिला डाव

टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पहिल्या डावात यशस्वी जयस्वालची विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी शतक ठोकलं अन् सरफराज खानने 62 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर डेब्यू सामना खेळणाऱ्या ध्रुव जुरेलने देखील 46 धावा करत टीम इंडियाला 400 पार पोहोचवलं होतं. भारतीय संघाने पहिल्या डावात 445 धावा उभ्या केल्या अन् इंग्लंडला फलंदाजीला बोलवलं. इंग्लंडकडून मार्क वूडने 4 विकेट्स घेकल्या होत्या.

इंग्लंडचा पहिला डाव

पहिल्या डावात इंग्लंड चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. झॅक क्रॉली बाद झाल्यानंतर बेन डकेटने जबाबदारी स्विकारली अन् ओली पोल आणि जो रूट यांच्यासह छोट्या छोट्या पार्टनरशीप केल्या. बेन डकेट याने सेच्युरी ठोकली अन् कॅप्टन बेन स्टोक्ससोबत धावगती वाढवली. दुसरीकडे विकेट्स पडत असताना बेन डकेटने मात्र 150 धावा पूर्ण केल्या. त्याच्या या दीडशतकीय खेळीमुळे इंग्लंडला 319 धावा उभारता आल्या आहेत. तर मोहम्मद सिराजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा उभं राहता आलं नाही. सिराजने 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचा दुसरा डाव

तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) द्विशतकीय खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडसमोर 557 धावांचं लक्ष्य ठेवलंय. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने 214 धावांची खेळी केली तर शुभमन गिलने 91 धावांची संयमी इनिंग खेळली. तर मैदानावर यशस्वी जयस्वालला मोलाची साथ देणाऱ्या सरफराज खानने नाबाद 68 धावा कुटल्या. इंग्लंडकडून जो रूट, टॉम हार्टली आणि रेहन अहमदने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

इंग्लंडचा दुसरा डाव

टीम इंडियाने इंग्लंडसमोर 557 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची हवा निघाली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रेशरमध्ये आता त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मैदानात टिकता आलं नाही. रोहितने एका बाजूने रविंद्र जडेजाला गोलंदाजीला लावल्याने इंग्लंडच्या विकेट्स पडत गेल्या. 50 धावांवर 7 गडी बाद अशी परिस्थिती इंग्लंडची झाली होती अन् इंग्लंडचा संघ 122 धावांवर गारद झाला. रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात 5 विकेट्स पटकावले.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.