टी-२० मधली सर्वाधिक धावसंख्या, अफगाणिस्तानचा विक्रम

अफगाणिस्तानच्या टीमने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

Updated: Feb 24, 2019, 04:35 PM IST
टी-२० मधली सर्वाधिक धावसंख्या, अफगाणिस्तानचा विक्रम title=

उत्तराखंड : अफगाणिस्ताननं आयर्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये ८४ रनने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच अफगाणिस्तानच्या टीमने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. या विजयासोबतच तीन टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये अफगाणिस्तानने २-० अशी आघाडी घेतली आहे, तसेच सीरिजही जिंकली आहे.

या मॅचमध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. हजरतुल्लाह जाजई आणि उस्मान घानी या अफगाणिस्तानच्या ओपनरनी स्फोटक सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल द्विशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३६ रन केल्या. हजरतुल्लाह जाजईने ६२ बॉलमध्ये तडाखेदार १६२ रन केल्या. यात त्याने १६ सिक्स आणि ११ फोर लगावले. तर उस्मान घानीने ७३ रन केले. या दोघांच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताननं प्रतिस्पर्धी आयर्लंडला विजयासाठी २७९ रनचे आव्हान दिले.

विजयासाठी दिलेल्या २७९ रनचे पाठलाग करायला आलेल्या आयर्लंडची सुरुवात चांगली झाली. आयर्लंडने पहिल्या विकेटसाठी १२६ रनची भागीदारी केली. कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि केविन ओब्रायन यांनी चांगली सुरुवात दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२६ धावा जोडल्या. यानंतर मात्र सातत्यानं आयर्लंडने विकेट गमावल्या. आयर्लडंकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक ९१ रन केल्या. तर केविन ओब्रायनने ३७ रन केले. या दोघांचा अपवाद वगळता कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही.

अफगाणिस्तानचा रेकॉर्ड

डेहरा़डूनच्या राजीव गांधी स्टेडिअम मध्ये ही मॅच खेळण्यात आली होती. या मॅच मध्ये अनेक रेकॉर्डची नोंद करण्यात आली. अफगाणिस्तानने प्रथम बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये २७८ रन केल्या. यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक उच्चांकी स्कोअर करण्याचा रेकॉर्ड आता अफगाणिस्तानच्या नावे झाला आहे. यासोबतच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या २६३ रनचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियाने २०१६ला श्रीलंकेविरुद्ध खेळताना २६३ रन केल्या होत्या. तसेच पहिल्या विकेटसाठी अफगाणिस्तानकडून हजरतउल्ला झजाई आणि उस्मान घानी या जोडीने २३६ रनची भागीदारी केली. यामुळे हादेखील एक रेकॉर्ड ठरला आहे. तसेच हजरत उल्ला याने १६२ रन केले. यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये आशियाई खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे.