Hardik Pandya Talking about Test Cricket and MS Dhoni: भारतीय टी-20 (Team India T-20) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) स्वत:ची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर केली आहे. आपण टी-20 क्रिकेटमधील तणावाची परिस्थिती सहन करु शकतो आणि कोणतीही भूमिका बजावू शकतो असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला आहे. सहा वर्षांपूर्वीच्या एका पत्रकार परिषदेमध्ये पंड्याने, "मला हवा तेव्हा मी षटकार मारु शकतो," असा दावा केला होता. मात्र आता हार्दिक आपण सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत नेऊ शकतो असं सांगतो. इतकच नाही तर एम. एस. धोनीने ज्याप्रकारे त्याच्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात संघाची जबाबदारी घेतली होती ते सर्व आपण करु शकतो असंही पंड्या म्हणाला आहे.
"खरं सांगायचं झालं तर षटकार मारणं मला फार आवडतं. मात्र आता माझ्यात बरीच सुधारणा झाली आहे आणि यालाच आयुष्य म्हणतात," असं हार्दिकने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं. "मला दुसऱ्या भागाचीही काळजी घ्यावी लागते. भागीदारी उभारण्यावर माझा फार विश्वास आहे. माझ्या संघाला आणि माझ्या सहकाऱ्यांना अधिक आत्मविश्वासने खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे हा विश्वास निर्माण करणं मला महत्त्वाचं वाटतं. सध्या संघात असलेल्यांपैकी सर्वाधिक सामने मी खेळलो आहे. त्यामुळे मी अधिक अनुभवी आहे. खास करुन मी ज्या स्थानावर फलंदाजी केली आहे त्यामधून मी प्रेशर हॅण्डल करायला शिकलो आहे. तणावाच्या परिस्थितीमध्ये संघ आणि स्वत:ला शांत ठेवण्याची कला मी अवगत केली आहे," असं पंड्या म्हणाला.
"हे सर्व करताना माझा स्ट्राइक रेट कमी होऊ शकतो. नव्या संधी किंवा नव्या भूमिका स्वीकारण्यास मी कायमच प्राधान्य दिलं आहे. मला माहीने (धोनीने) जी भूमिका बजावली तशीच भूमिका पार पडण्यातही काही अडचण नाही. तेव्हा मी फार तरुण होतो. तेव्हा मी मैदानातील सर्वच भागांमध्ये फटकेबाजी करायचो. मात्र अता अचानक तो गेल्याने (निवृत्त झाल्याने) अचानक ती जबाबदारी माझ्यावर आली आहे. ही जबाबदारी पार पडण्यास माझी काही हरकत नाही. आम्हाला जे निकाल अपेक्षित आहेत ते मिळत आहेत," असं पंड्या म्हणाला.
याच वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर 2024 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा कॅरेबियन बेटांवर खेळवली जाणार आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला माझं प्राधान्य आहे असं हार्दिकने सांगितलं. कसोटी क्रिकेटऐवजी सध्या आपण व्हाइट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आहे. 2019 मध्ये हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रीय झाल्यापासून तो कसोटी सामने खेळलेला नाही. 2018 मध्ये साऊथहॅम्पटनमध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. याच वर्षी तो त्याचा शेवटचा रणजी सामनाही खेळला होता.
"कसोटी क्रिकेट खेळण्यासाठीचा योग्य वेळ आहे असं मला वाटेल तेव्हा मी पुनरागमन करेन," असं हार्दिक म्हणाला. "सध्या मी व्हाइट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत असून मला ते महत्त्वाचं वाटतं. योग्य वेळ येईल तेव्हा आणि माझं शरीर साथ देईल त्यावेळी मी या दीर्घ फॉरमॅटचा विचार करेन," असंही भारतीय संघाच्या टी-20 च्या कर्णधाराने सांगितलं.