माऊंट मॉनगनुई : ऑस्ट्रेलियातल्या यशस्वी दौऱ्यानंतर विराटच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिज जिंकली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला. यामुळे ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे. याच मॅचमधून हार्दिक पांड्यानं भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं आहे. पुनरागमनाच्या या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं १० ओव्हरमध्ये ४५ रन देऊन २ विकेट घेतल्या. याचबरोबर हार्दिक पांड्यानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा उत्कृष्ट कॅच घेतला. पण हार्दिक पांड्याला बॅटिंगची संधी मात्र मिळाली नाही.
हार्दिक पांड्याच्या या कामगिरीमुळे भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली खुश झाला आहे. हार्दिक पांड्यामुळे भारतीय टीमचं संतुलन नीट होतं. पांड्यानं आज चांगली कामगिरी केली, असं विराट म्हणाला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं विजय शंकरची जागा घेतली. पण विराटनं विजय शंकरचंही कौतुक केलं. विजय शंकर आणि शुभमन गिल यांच्यासारखे युवा खेळाडू टीममध्ये येत असल्यामुळे मी उत्साही असल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडचा ४९ ओव्हरमध्ये २४३ रनवर ऑल आऊट झाला. मोहम्मद शमीनं ३ विकेट तर पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. २४४ रनचा पाठलाग करताना रोहित शर्मानं सर्वाधिक ६२ रन, कर्णधार विराट कोहलीनं ६० रन केले. अंबाती रायुडूनं नाबाद ४० आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ३८ रन करून भारताला जिंकवून दिलं.
एकीकडे हार्दिक पांड्याचं भारतीय टीममध्ये यशस्वी पुनरागमन झालं असलं तरी केएल राहुलनं मात्र पुन्हा एकदा निराशा केली आहे. तिरुवनंतपूरममध्ये भारत ए आणि इंग्लंड लायन्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये केएल राहुल २५ बॉलमध्ये १३ रन करून आऊट झाला. केएल राहुल अजिंक्य रहाणेसोबत सलामीला बॅटिंगला आला होता. सुरुवातीलाच राहुलनं २ फोर मारल्या. पण फास्ट बॉलर जिमी ओव्हरटननं राहुलला माघारी पाठवलं.
'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं दोन्ही खेळाडूंचं निलंबन केलं होतं. अखेर या दोन्ही खेळाडूंवरची बंदी मागे घेण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आणि दोन्ही खेळाडूंचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.