मुंबई : टीम इंडियाचा (Team India) सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मानल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस (Hardik Pandya Birthday). टीम इंडियाचा सर्वात स्टायलिश आणि डॅशिंग खेळाडू म्हणून आज त्याची ओळख आहे. आक्रमक फलंदाजी, दमदार गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने टीम इंडियात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच टीम इंडियातील महत्त्वाचा खेळाडू असलेला हार्दिक टी20 विश्वचषक संघात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
पण टीम इंडियात स्थान मिळवणं इतकं सोप नव्हतं, त्यासाठी हार्दिकला मोठा संघर्ष करावा लागला आहे. गुजरातच्या सूरतमध्ये 11 ऑक्टोबर 1993 ला हार्दिक पांड्याचा जन्म झाला. पांड्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण हार्दिकच्या वडिलांनी हार्दिक आणि कृणाल या दोन्ही मुलांना खेळासाठी कधीच कमी पडू दिलं नाही. हार्दिक आणि कृणालला त्यांनी किरण मोर यांच्या क्रिकेट अकॅडेमीत प्रवेश घेऊन दिला आणि इथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले.
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या हार्दिकाचं अभ्यासात मात्र कधीच मन रमलं नाही. नववीत असताना तो नापास झाला. यानंतर त्याने शिक्षण सोडलं आणि आपलं पूर्ण लक्ष क्रिकेटकडे वळवलं. त्यावेळी हार्दिक आणि कृणालकडे स्वत:ची क्रिकेट किटही नव्हती. बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट किट घेऊन ते प्रॅक्टिस करत असत.
हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. एक काळ तर असा होता की पैसे नसल्याने केवळ मॅगी खाऊन त्याने दिवस काढले. क्रिकेट खेळण्यासाठी त्याला चक्क ट्रकने प्रवास करावा लागत होता.
पण आज कठोर मेहनत आणि खेळाच्या जोरावर हार्दिकने अशक्य ते शक्य करुन दाखवलं आहे. श्रीमंत खेळाडूंमध्ये आज हार्दिकची गणना होते. आज त्याच्याकडे स्वत:चा अलिशान बंगला आणि महागड्या गाड्या आहेत. हार्दिकनं गर्लफ्रेंड नताशा स्टाकोविचसोबत लग्न केलं.