वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळायचं का? गंभीर म्हणतो; 'देशापेक्षा २ पॉईंट्स महत्त्वाचे नाही'

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले.

Updated: Mar 18, 2019, 07:29 PM IST
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळायचं का? गंभीर म्हणतो; 'देशापेक्षा २ पॉईंट्स महत्त्वाचे नाही' title=

नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्धचा संताप वाढला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली. काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीचं समर्थन केलं. या सगळ्या प्रकरणावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाष्य केलं आहे.

'पाकिस्तानविरुद्ध खेळायचं का नाही हे बीसीसीआयने ठरवले पाहिजे. पण पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यामध्ये मला काहीच चूक वाटत नाही. माझ्यासाठी २ पॉईंट्स महत्त्वाचे नाही. क्रिकेटच्या तुलनेत जवान जास्त महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी देश पहिले येतो', असं गंभीर म्हणाला.

'जरी भारताला वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळावं लागुदे. तुम्ही फायनलमध्ये गेलात तर देशाला यासाठी तयार राहायला पाहिजे. खेळ आणि राजकारण यांची तुलना करु नका, अशी प्रतिक्रिया समाजाच्या कोणत्याच भागातून यायला नको', असं वक्तव्य गंभीरने केलं.

या वर्ल्ड कपमध्ये १६ जूनला भारत आणि पाकिस्तानची मॅच नियोजित आहे. सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनी भारताने या मॅचवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली. 'हा वर्ल्ड कप १० टीमचा आहे. प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळेल. त्यामुळे भारतानं वर्ल्ड कपमध्ये एक मॅच खेळली नाही, तरी काही फरक पडणार नाही', अशी प्रतिक्रिया सौरव गांगुली याने दिली होती.

सचिन तेंडुलकर याने मात्र वेगळं मत मांडलं होतं. पाकिस्तानला फुकटचे २ पॉईंट्स देण्याऐवजी त्यांचा पराभव करा, असं सचिन तेंडुलकर म्हणाला होता. सचिन तेंडुलकर याच्या मागणीचं सुनील गावसकर यांनीही समर्थन केलं होतं.

भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही यावर आपलं मत मांडलं होतं. याबद्दल भारत सरकार आणि बीसीसीआयसोबत आहोत. ते जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. या निर्णयाचा आम्ही सन्मान करू, असं विराट म्हणाला होता.