आयपीएल २०१९ : धोनी आणि चाहत्यामध्ये रंगला पकडापकडीचा डाव

हा व्हिडीओ चेन्नई टीमने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन अपलोड केला आहे.  

Updated: Mar 18, 2019, 06:10 PM IST
आयपीएल २०१९ : धोनी आणि चाहत्यामध्ये रंगला पकडापकडीचा डाव title=

चेन्नई : आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला एकदा तरी भेटायची इच्छा त्याच्या चाहत्याची असते. धोनीचे क्रिकेट चाहते किती आहेत हे सांगण्याची गरज नाही. याची प्रचिती आपल्याला अनेक मॅच दरम्यान आलेली आहे. क्रिकेटमध्ये धोनीचा असा स्वत्रंत चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे मध्ये असाच एक चाहता मैदानात आला होता. या घटनेला महिना उलटत नाही त्यातच आता पुन्हा एकदा एक चाहता धोनीला मैदानात भेटण्यासाठी शिरला. 

आयपीएलचा १२वा मोसम येत्या २३ मार्चपासून सुरु होतं आहे. पहिली मॅच बंगळुरू आणि चेन्नईमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नईची टीम एमए चिंदबरम स्टेडियममध्ये सराव करत होती. यावेळी धोनीचा चाहता मैदानात शिरला. धोनीने त्याच्या सोबत पकडापकडीचा खेळ सुरु केला. हा व्हिडीओ चेन्नई टीमने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन अपलोड केला आहे.

 

या व्हिडिओ मध्ये धोनी मैदानात आलेल्या आपल्या चाहत्याला पाहून लक्ष्मीपती बालाजीच्या आडून ऊभा राहिला. ये मला पकडून दाखव, असं म्हणतं धोनी आणि त्या चाहत्यानी बालाजीच्या भोवती दोन फेऱ्या मारल्या. यानंतर धोनीने चाहत्याला चांगलेच पळवले. धोनी नेहमी प्रमाणे या व्हिडिओमध्ये देखील मस्तीच्या मूड मध्ये पाहायला मिळाला. धोनीला पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या त्या चाहत्याला मैदानावर उपस्थित असलेल्या टीमच्या सदस्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी अडवले. चाहत्याला मैदानाबाहेर घेऊन जाताना धोनीने चाहत्याची हात मिळवण्याची इच्छा पूर्ण केली.

नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे दरम्यान धोनीचा असाच एक चाहता सुरक्षा भेदून मैदानात शिरला होता. धोनीने मैदानात आलेल्या या चाहत्यासोबत देखील पकडापकडी खेळली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करुन फिल्डींग साठी भारतीय टीम मैदानात आली असताना हा किस्सा घडला होता.

अधिक वाचा : INDvsAUS: सुरक्षा भेदून भेटायला आलेल्या फॅनसोबत धोनीची 'पकडापकडी'