कर्स्टननं दिलं भारतीय टीमच्या बदलाचं श्रेय, ज्याच्यामुळे झाला धोनी-शास्त्रीमध्ये वाद

गॅरी कर्स्टन हा भारतीय टीमच्या यशस्वी प्रशिक्षकापैकी एक होता. 

Updated: Apr 22, 2018, 08:45 PM IST
कर्स्टननं दिलं भारतीय टीमच्या बदलाचं श्रेय, ज्याच्यामुळे झाला धोनी-शास्त्रीमध्ये वाद title=

मुंबई : गॅरी कर्स्टन हा भारतीय टीमच्या यशस्वी प्रशिक्षकापैकी एक होता. २०११ सालचा वर्ल्ड कप भारतानं जिंकला तेव्हा कर्स्टनच प्रशिक्षक होता. २०११ सालच्या वर्ल्ड कपनंतर कर्स्टन प्रशिक्षकपदावरून पायउतार झाला. कर्स्टननंतर डंकन फ्लेचरना भारताचा प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं. फ्लेचरनी ४ वर्ष भारताचं प्रशिक्षकपद भुषवलं. या कालावधीमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खान त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होते. या काळामध्ये फ्लेचर आणि धोनीनं असं वातावरण तयार केलं ज्यामुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट समजून घेताना फायदा झाला, असं कर्स्टन म्हणाला आहे. आकडे बघूनच आपण यश अपयाशाचं मोजमाप करतो पण अशा अनेक गोष्टी असतात ज्यादेखील महत्त्वाच्या असतात, अशी प्रतिक्रिया कर्स्टननं दिली आहे.

प्रत्येकाची पद्धत वेगळी

प्रशिक्षण देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. प्रशिक्षकाचं यश हे टीमच्या प्रदर्शनावर अवलंबून असतं असं बोललं जातं. पण त्यापेक्षा प्रशिक्षकाचा प्रभाव खेळाडूवर किती पडला हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य कर्स्टन यांनी केलं आहे.

२०१४ इंग्लंड दौऱ्यानंतर वाद

डंकन फ्लेचर प्रशिक्षक असतानाच धोनी आणि रवी शास्त्रीमध्ये वाद झाल्याचं बोललं जातं. ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीमनं वाईट कामगिरी केली. या खराब प्रदर्शनानंतर बीसीसीआयनं रवी शास्त्रीला डायरेक्टर म्हणून नियुक्त केलं. तेव्हा प्रशिक्षक डंकन फ्लेचर होते. नियुक्तीनंतर आता सगळ्या गोष्टी मी बघीन. तसंच प्रशिक्षक मला माहिती देतील, असं शास्त्री म्हणाले होते. धोनीनं मात्र फ्लेचरच बॉस असेल अशी कडक भूमिका घेतली होती. यामुळे धोनी-शास्त्रीमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

बीसीसीआय धोनीवर नाराज

धोनीच्या या भूमिकेमुळे बीसीसीआय नाराज झालं होतं. धोनी प्रशिक्षकाची निवड करू शकत नाही. हा निर्णय बीसीसीआय घेईल. तसंच वर्ल्ड कपसाठी निवड समिती कॅप्टन आणि प्रशिक्षकाची निवड करेल, असं तेव्हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं होतं. बोर्डानं फ्लेचरच्या कामकाजाच्या समिक्षेचं वक्तव्य केल्यानंतरही धोनीनं फ्लेचरच्या भविष्याबाबत भाष्य केलं होतं.

धोनीनं केला होता फ्लेचरचा बचाव

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा १-३नं पराभव झाला होता. या पराभवानंतर फ्लेचरची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. पण धोनीनं फ्लेचरचा बचाव केला होता. फ्लेचरच्या अधिकारांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. बाहेरचे लोकं काय विचार करतात ते मला माहिती नाही पण फ्लेचरचं टीमची सगळी जबाबदारी सांभाळेल फक्त टीममध्ये सपोर्ट स्टाफ वाढला आहे, असं धोनी म्हणाला होता.