कोलकाता : गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत. १८७७ साली पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात आली. पहिल्या १०० वर्षात क्रिकेटमध्ये जेवढे बदल झाले नाहीत त्यापेक्षा जास्त बदल शेवटच्या ४० वर्षांमध्ये झाले आहेत. आत्तापर्यंत ५ दिवस खेळवण्यात येणारी टेस्ट मॅच आता ४ दिवसांची व्हावी अशी मागणी होत आहे. टेस्ट मॅचनंतर ५० ओव्हरची वनडे मॅच आणि मग टी-20 क्रिकेट लोकप्रिय झालं. यानंतर आता इंग्लंडमध्ये १०० बॉलच्या क्रिकेटची तयारी सुरु झाली आहे. क्रिकेटच्या कमी होत चाललेल्या या फॉरमॅटबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट एवढंही छोटं होऊ नये की त्याचं अस्तित्वचं संपेल, अशी भीती गांगुलीला वाटतेय. १०० बॉलच्या क्रिकेटबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डानं सावध राहावं, असा सल्ला गांगुलीनं दिला आहे.
क्रिकेटचा फॉरमॅट छोटा झाल्यामुळे सर्वश्रेष्ठ आणि सर्वसामान्य खेळाडूंमधलं अंतर कमी होईल. पण टेस्ट क्रिकेटच खरं क्रिकेट आहे कारण दिवसाच्या पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला त्याच उर्जेनं खेळावं लागतं, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
१०० बॉलचा हा फॉरमॅट काऊंटी क्रिकेटमध्ये २०२० सालापासून सुरु होणार आहे. सध्या काऊंटीमध्ये टी-20 क्रिकेट खेळलं जात आहे. टी-20 मध्ये प्रत्येक टीम १२० बॉलचा सामना करतं. १०० बॉलच्या या फॉरमॅटसाठी ८ टीमची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. क्रिकेटचा हा नवा फॉरमॅट एकदम नवीन कल्पना असल्याची प्रतिक्रिया ईसीबीचे अध्यक्ष टॉम हेरिसन यांनी दिली आहे. या फॉरमॅटमुळे क्रिकेट आणि लोकप्रिय आणि आकर्षक होईल आणि युवक क्रिकेटकडे आकर्षित होतील, असा विश्वासही हेरिसन यांनी बोलून दाखवला आहे.
हे असतील क्रिकेटचे नवीन नियम
- १०० बॉलच्या क्रिकेटमध्ये १६-१६ ओव्हरची मॅच असेल. यातल्या पहिल्या १५ ओव्हर ६-६ बॉलच्या असतील.
- या फॉरमॅटमधली शेवटची ओव्हर १० बॉलची असेल.
- ही मॅच टी-20 मॅचपेक्षा ४० मिनिटं लवकर संपेल.
- २०२० साली होणाऱ्या या स्पर्धेत ३८ दिवस ३६ मॅच होतील.
- ६ बॉलच्या ओव्हरला १९७९मध्ये सुरुवात झाली. याआधी एक ओव्हर चार, पाच, सहा आणि आठ बॉलची असायची.
- ईसीबीनं २००३मध्ये सगळ्यात आधी टी-20 क्रिकेटची सुरुवात केली होती. आता १०० बॉलचा फॉरमॅटही ईसीबीच घेऊन आलं आहे. काही ठिकाणी १०-१० ओव्हरच्या क्रिकेट मॅचही खेळल्या जातात, पण या फॉरमॅटला अधिकृत मान्यता मिळालेली नाही.