हिसार : सोशल मीडियावर (Social Media) अनुसूचित जातीविरोधात वक्तव्य केल्याबद्दल हांसी पोलिसांनी (Hansi Police) शनिवारी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) अटक केली. ही अटक 2019 च्या एका प्रकरणात करण्यात आली. अटकेनंतर थोड्याच वेळात युवराजला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन मिळाला. आता हांसी पोलीस युवराज सिंगच्या विरोधात न्यायालयात चालान सादर करणार आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गुप्त ठेवलं. मात्र आता हे उघड झालं आहे. (Former Indian cricketer Yuvraj Singh has been arrested and granted bail by Hansi police for making racist remarks)
"जून २०२० मध्ये रजत कलसन नावाच्या व्यक्तीने युवराज सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. रजतने युवराजवर अनुसूचित जातीविरोधात टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने तपास केला. तपासानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी युवराज सिंगला शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. डीसीपी विनोद शंकर यांनी हिसारच्या पोलीस खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्याच्या मेसमध्ये बसून युवराज सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर जवाब नोंदवून घेतला. यानंतर युवराजला अटक करण्यात आली", अशी माहिती हासी पोलिस स्थानकाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष कुमार यांनी दिली.
नक्की प्रकरण काय?
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये युवराज गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये संवाद साधत होता. यावेळी युवराजने दलितांविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्याने हा शब्द युझवेंद्र चहलला उद्देशून वापरला होता.
यानंतर नेटीझन्सकडून युवराजवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणी मानवी हक्क संस्थेचे समन्वयक रजत कलसनने गेल्या वर्षी 2 जूनला गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेची मागणी केली होती. युवराजवर IPC च्या कलम 153, 153A, 295, 505 सह SC / ST कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.
युवराजचा माफीनामा
दरम्यान या सर्व प्रकरणानंतर युवराजने या प्रकरणी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली होती. "मला हे स्पष्ट करायचे आहे की मी रंग, जात किंवा लिंगाच्या आधारावर कोणत्याही भेदभावावर विश्वास ठेवत नाही. मी माझे आयुष्य लोकांच्या हितासाठी जगलो आहे आणि भविष्यातही असंच जगायचं आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मला समजलं की मी माझ्या मित्रांशी बोलत होतो आणि त्यावेळी माझा मुद्दा चुकीच्या पद्धतीने घेतला गेला, जो अयोग्य होता.तरीसुद्धा, एक जबाबदार भारतीय म्हणून, मी हे सांगू इच्छितो की जर माझ्या शब्दांनी अनवधानाने कोणाला दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. देश आणि देशातील लोकांसाठी माझे प्रेम नेहमीच राहील", अशा शब्दात युवराजने जाहीर माफी मागितली होती.