भारतात प्रथमच डे-नाईट टेस्ट, असा आहे इतिहास

डे-नाईट टेस्ट सामन्याचा इतिहास

Updated: Nov 21, 2019, 04:37 PM IST
भारतात प्रथमच डे-नाईट टेस्ट, असा आहे इतिहास  title=

कोलकाता : भारतात प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळली जाणार आहे. भारतात जरी प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळली जाणार असली तरी सर्वात प्रथम डे-नाईट टेस्ट ही २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळली गेली. डे-नाईट टेस्टचं आयोजन करण्यामागे नक्की काय उद्देश आहे.

टेस्ट क्रिकेट हा क्रिकेटचा मूळ आणि प्रतिष्ठित फॉर्म्याट. १८७७ मध्ये सर्वात प्रथम अधिकृत टेस्ट मॅच खेळली गेली. त्यानंतर १९७१ मध्ये पहिली वन-डे मॅच खेळली गेली. वन-डेमध्ये एका दिवसातच निकाल लागत असल्यानं आणि मर्यादीत ओव्हर्स असल्यानं मॅच रंगतदार होत असल्यानं वन-डे क्रिकेट फॅन्सला अधिक भावू लागलं. यानंतर १९९२च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलला आणि वन-डे क्रिकेटला एकप्रकारे ग्लॅमरचं स्वरुप आलं. यामुळे साहजिकच पारंपरिक पांढऱ्या जर्सीत खेळणारे खेळाडू आणि पाच दिवस चालणारे टेस्ट क्रिकेट रटाळ वाटू लागले. यात पुन्हा बहुतांश टेस्टचा निकालच लागत नसल्यानं क्रिकेटफॅन्स टेस्ट क्रिकेटकडे पाठ फिरवू लागले. 

वन-डेनंतर २००४ मध्ये पहिली टी-२० इंटरनॅशनल मॅच खेळली गेली आणि क्रिकेटचा चेहरा-मोहराच बदलला गेला. क्रिकेटला जणूकाही फास्ट एँड फ्युरियसचं स्वरुप प्राप्त झालं. मग क्रिकेटचा मूळ गाभा असलेल्या टेस्ट क्रिकेटला वाचवण्यासाठी आयसीसीची धडपड सुरु झाली. टेस्ट क्रिकेटला अधिक रंजक कसं करता येईल यातूनच मग डे-नाईट टेस्ट आणि पिंग बॉलसारखे पर्याय समोर आले. याखेरीज काम संपल्यावर आरामात टेस्ट पाहण्याचा आनंदही क्रिकेटफॅन्सला उठवता येईल जेणेकरुन टेस्ट क्रिकेटला पुन्हा सुगीचे दिवस येतील याच उद्देशानं डे-नाईट टेस्ट सुरु करण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला. 

वन-डे क्रिकेट सुरु झाल्यावर ३६ वर्षांनी म्हणजे २०१५मध्ये डे-नाईट टेस्टला सुरुवात झाली. सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियातील ऍडलेड स्टेडियमवर २०१५ मध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळली गेली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही टेस्ट खेळली गेली. आतापर्यंत ११ डे-नाईट टेस्ट खेळल्या गेल्या आहेत. 

ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत डे-नाईट टेस्ट खेळल्या गेल्या आहेत. भारतात प्रथमच कोलकाता इथं डे-नाईट टेस्ट खेळली जाणार असून टीम इंडियादेखील प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. डे-नाईट टेस्ट आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं आपलं वर्चस्व राखलं आहे.

ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही डे-नाईट टेस्ट जिंकल्या आहेत. श्रीलंकेनं दोनदा आणि पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेनं एकदा डे-नाईट टेस्ट जिंकली आहे. तर वेस्ट इंडिजनं आपल्या सर्वच्या सर्वच्या सर्व तिन्ही टेस्ट गमावल्या आहेत. 

वातावरणातील काही घटकांमुळे आणि योग्य फ्लड लाईड्स नसल्यामुळे भारतात आतापर्यंत एकही डे-नाईट टेस्ट खेळवली गेलेली नाही. मात्र माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि लागलीच त्यानं भारतात डे-नाईट टेस्ट खेळवण्याचा निर्णय घेतला. आता टीम इंडिया खेळत असलेल्या पहिल्या-वहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये टीम इंडिया विजयी सलामी देणार का याकडेच देशासियांचं लक्ष लागलंय.