मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाकडून खेळण्याची संधी न मिळाल्याने या खेळाडूचा हिरमोड झाला. या निराशेतूनच त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. सनराजयर्ज हैदराबादने 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. हा खेळाडू या विजयी संघाचा सदस्य होता. तसेच हा ऑलराऊंडर खेळाडू पंजाब किंग्सकडूनही खेळला आहे. (first class cricket punjab team all rounder Bipul Sharma retire)
कोण आहे तो?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑलराऊंडर बिपुल शर्मा (Bipul Sharma)आहे. बिपुल देशांतर्गत क्रिकेटमधील मोठं नाव राहिलं आहे. बिपुल निवृत्तीनंतर यूएसएत (USA)स्थायिक झाला आहे. अमेरिकेकडून खेळण्याच्या उद्देशाने तो तिथे गेला आहे.
बिपुल मुळचा पंजाबमधील अमृतसरचा. टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करावं, असं त्याचं स्वप्न होतं, जे प्रत्येक खेळाडूचं असतं. मात्र त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
बिपुलने 59 फर्स्ट क्लास सामन्यात 8 शतक आणि 18 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 12 धावा केल्या आहेत. तसेच 126 विकेट्सही पटकावल्या आहेत. बिपुलने पंजाबकडून 2005 मध्ये फर्स्ट क्लास डेब्यू केलं होतं.
बिपुलने स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाब व्यतिरिक्त हिमाचल प्रदेश आणि सिक्किमचंही प्रतिनिधित्व केलं आहे. आता बिपुल यूएसएकडून खेळणार आहे. त्यामुळे त्याला आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, एखाद्या क्रिकेटरला जर परदेशात होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळायचं असेल, तर त्याला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागतं.
दरम्यान, बिपुल यूएसएत कोणत्या स्पर्धेत खेळणार आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र तिथे स्थायिक झालेले बहुंताश भारतीय क्रिकेटपटू हे मायनर लीगसोबत करार करतात.
क्रिकेट कारकिर्द
बिपुलने आयपीएलमध्ये 33 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 59 प्रथम श्रेणी सामन्यात 3 हजार 12 धावा केल्या. तसेच 126 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच बिपुवने 96 लिस्ट ए सामन्यात 1 हजार 620 धावा कुटल्या आहेत. तसेच 96 विकेट्स मिळवल्या आहेत. बिपुलने 105 टी 20 सामन्यात 1 हजार 203 रन्स केल्या आहेत आणि 84 विकेट्स मिळवल्या आहेत.