FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे. 

Updated: Dec 1, 2022, 06:45 PM IST
FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित title=

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप (FIFA WC 2022) स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी गट ए, गट बी, गट सी आणि गट डी मधील संघाचे प्रत्येकी तीन सामने झाले आहेत. तर गट ई, गट एफ, गट जी आणि गट एच मधील साखळी फेरीतील प्रत्येकी दोन सामने होणं बाकी आहे. त्यामुळे शुक्रवारी या गटाचं चित्र स्पष्ट होणार आहे. ए, बी, सी, डी या गटातून नेदरलँड, युएसए, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोलंड, इंग्लंड आणि सेनेगलनं आपलं स्थान सुपर 16 फेरीत निश्चित केलं आहे. तर ब्राझील आणि पोर्तुगलचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

फीफा वर्ल्डकप गट 'ए'

साखळी फेरीतील सामन्यात गट ए मधून नेदरलँड आणि सेनेगलनं सुपर 16 फेरीत स्थान निश्चित केलं आहे. नेदरलँडनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला. सेनेगलला 2-0 आणि कतारला 2-0 ने पराभूत केलं. तर इक्वॉडोरविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. सेनेगलनं दोन सामने जिंकत आपलं स्थान निश्चित केलं आहे. सेनेगलनं कतारचा 3-1 आणि इक्वॉडोरचा 2-1 ने पराभव केला. तर नेदरलँडकडून 0-2 ने पराभव सहन करावा लागला. सुपर 16 फेरीत नेदरलँडचा युएसए सोबत सामना असणार आहे. तर सेनेगलचा इंग्लंडशी सामना असणार आहे.

फीफा वर्ल्डकप गट 'बी'

गट बी मधून इंग्लंड आणि यूएसएची वर्णी सुपर 16 फेरीत लागली आहे. इंग्लंडने इराणचा 6-2, वेल्सचा 3-0 ने पराभव केला. तर युएसएविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. दुसरीकडे, युएसएनं इराणचा 0-1ने पराभव केला. तर इंग्लंड आणि वेल्सविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. गुणतालिकेतील पॉईंटच्या जोरावर यूएसए सुपर 16 फेरीत पोहोचला आहे. आता सुपर 16 फेरीत यूएसए विरुद्ध नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध सेनेगल सामना असणार आहे. 

बातमी वाचा- FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय

फीफा वर्ल्डकप गट 'सी'

गट सी मधून अर्जेंटिना आणि पोलंडनं सुपर 16 फेरीत धडक मारली आहे. पहिल्याच सामन्यात सौदी अरबियानं बलाढ्य अर्जेंटिना 2-1 ने पराभूत केल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अर्जेंटिना जोरदार कमबॅक करत मेक्सिकोला 2-0 आणि पोलंडला 2-0 ने पराभूत करत आपलं सुपर 16 फेरीतील स्थान निश्चित केलं. पोलंडनं गुणतालिकेतील पॉईंटवर सुपर 16 फेरीत धडक मारली आहे. पोलंड, मेक्सिको आणि सौदी अरेबियाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. गोलची संख्या पाहता पोलंडचं स्थान निश्चित झालं आहे. पोलंडनं सौदी अरेबियाला 2-0 ने पराभूत केलं. मेक्सिकोविरुद्धचा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला. तर अर्जेंटिनाने 2-0 ने पराभूत केलं.

फीफा वर्ल्डकप गट 'डी'

गट डी मधून फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने सुपर 16 फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यात विजय मिळवून हे स्थान निश्चित केलं आहे. फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 4-1 आणि डेन्मार्कचा 2-1 ने पराभूत केलं. तर टुनिसियाकडून 1-0 ने पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने टुनिसियाचा 0-1 आणि डेन्मार्कचा 0-1 ने पराभव केला. तर फ्रान्सकडून 4-1 ने पराभव सहन करावा लागला.