Rohit Sharma Viral Photo: एशिया कपमध्ये टीम इंडियाचा बांगलादेशने 6 रन्सने पराभव केला. टिम इंडियाचा हा एशिया कपमधील पहिला पराभव आहे. असे असले तरी टीम इंडियाने यापूर्वीच एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. दरम्यान एशियाकपमधील रोहित शर्माचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. एशिया चषक 2023 च्या सुपर फोर फेरीत भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतरचा हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ग्राउंड स्टाफ दिसत आहेत. हा फोटो पाहून सारेजण रोहित शर्माचे कौतूक करत आहेत.
या फोटोमध्ये रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅचचा चेक ग्राउंड स्टाफला देताना दिसत आहे. हा फोटो फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया साइट्सवर चर्चेत आहे. रोहित शर्माने मॅच विनरची बक्षीस रक्कम सर्व ग्राउंड स्टाफला दिली, असे या फोटोखाली कॅप्शन लिहिले जात आहे. पण या फोटोमागचे नेमके सत्य काय आहे? त्यावेळी नेमके काय घडले होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
या बातमीचे सत्य काय आहे? व्हायरल फोटो डिजिटल पद्धतीने बदलण्यात आला होता. याव्यतिरिक्त, कोणत्याही पुरस्कार वितरणाबाबत भारताकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या व्हायरल पोस्टवरील रिव्हर्स इमेज सर्चमुळे अनेक बातम्या समोर आल्या. पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना पुन्हा सुरू करण्यात ग्राउंड्समनने खूप महत्वाची भूमिका बजावली होती.पावसामुळे हा सामना राखीव दिवशी हलवण्यात आला. सर्वात महत्वाचे म्हणजे या सामन्यात रोहित शर्मा सामनावीर नव्हता तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला होता. त्यामुळे रोहितकडे त्या दिवशी मॅन ऑफ द मॅचचा चेक असू शकत नाही, हे स्पष्ट होते.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ग्राउंड्समनच्या हातात धनादेश दिसतोय असे दाखवले आहे. पण कोणी त्यांना तो धनादेश सुपूर्द करताना दिसत नाही. त्याच फोटोत रोहित शर्मा पाठमोरा दिसत आहे. त्यामुळे धनादेश देतानाचा फोटो कोणीतरी डिजीटली जोडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतरी खोडसाळपणा करुन हा फोटो तयार केला आणि त्यासोबत रोहित शर्माचे नाव जोडल्याचे दिसून आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही सामन्यानंतर साधलेल्या संवादामध्ये मैदानावरील ग्राऊंड्समनचे कौतुक केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांना दाद दिली आहे.