IPL 2023 Playoffs Scenario For RCB and MI Explained: इंडियन प्रमिअर लिगच्या (IPL 2023) 67 व्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) मोठा विजय मिळवत आपलं प्लेऑफ्समधलं (Playoffs) स्थान निश्चित केलं. लखनऊ सुपर जायंट्सनेही आपलं स्थान प्लेऑफमध्ये निश्चित केलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफ्समध्ये खेळणारा अंतिम संघ कोण हाच प्रश्न सध्या अनुत्तरित राहिला आहे. गुजरात आणि चेन्नई आणि लखनऊचे संघ प्लेऑफससाठी पात्र ठरल्याने आता 3 संघांमध्ये अंतिम स्थानासाठी रस्सीखेच सुरु आहे. सध्या या 3 संघांपैकी बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्सचं नशीब त्यांच्या हाती आहे तर राजस्थान रॉयल्सला जर तर अवलंबून रहावं लागणार आहे. हे तिन्ही संघ क्वालिफाय होण्याची नेमकी सुत्रं काय आहेत जाणून घेऊयात...
सध्याची स्थिती आणि नेट रन रेट पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकतो असा संघ दिसत आहे. मुंबई आणि राजस्थानच्या तुलने आरसीबी पात्र ठरण्याची शक्यता सध्याच्या स्थितीला अधिक आहे. गुजरातविरुद्धचा सामना जिंकून आरसीबीचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकते. मात्र मुंबईने आज (21 मे 2023) हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रन रेटमध्ये मोठी उडी घेतली तर आरसीबीच्या अडचणी वाढू शकतात. सध्या आरसीबीचे नेट रन रेट +0.180 इतकं आहे. तर मुंबईचे नेट रन रेट -0.128 इतकं आहे. आज मुंबईचा संघ त्यांचा साखळी फेरीतील अंतिम सामना खेळणार असल्याने बंगळुरुला किती मोठा विजय आवश्यक आहे हे अधिक स्पष्टपणे समजणार असून त्यामुळे आवश्यक नेट रन रेटनुसार आरसीबी अंतिम सामन्यात गुजरातविरुद्ध आपली रणनिती ठरवू शकते.
सध्या तळाशी असलेल्या हैदराबादच्या संघाविरुद्ध विजय मिळवून साखळी फेरीतील अंतिम सामना जिंकण्याबरोबरच प्लेऑफ्सच्या शर्यतीत राहण्याचा मुंबईचा उद्देश असेल. मात्र मुंबईने हा सामना जिंकला आणि आरसीबीचा गुजरातने पराभव केला तरी मुंबईचं प्लेऑफ्समधील स्थान निश्चित होईल. आरसीबीने गुजरातला पराभूत केलं तर नेट रन रेटच्या जोरावर प्लेऑफ्समधील अंतिम संघ कोणता असेल हे निश्चित होईल. सध्याचा नेट रन रेट पाहिल्यास मुंबईला हैदराबादच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. मात्र आरसीबीनेही गुजरातवर मोठा विजय मिळवला तर मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न धुळस मिळेल. सध्या मुंबईचं सर्व नशीब हे गुजरातच्या संघाच्या हाती आहे.
राजस्थानचा संघ हा प्लेऑफ्सच्या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. मात्र त्यांच्या हाती काहीच नसून इतर दोन संघाच्या कामगिरीवर राजस्थान प्लेऑफ्समध्ये जाणार की नाही हे ठरणार आहे. आरसीबी आणि मुंबईचे संघ आपआपल्या ग्रुप स्टेजमधील अंतिम सामन्यांमध्ये पराभूत झाले तर राजस्थानचा संघ प्लेऑफससाठी पात्र ठरेल. सध्या राजस्थानचा संघ 14 गुणांवर आहे. आरसीबी आणि मुंबई पराभूत झाले तर त्यांचेही 14 गुण असतील. सध्या राजस्थानचं नेट रन रेट हे +0.148 इतकं आहे. तर आरसीबीचं नेट रन रेट हे +0.180 इतकं आहे. राजस्थानचं नेट रन रेट हे मुंबईपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव झाला तर नेट रन रेटच्या जोरावर राजस्थानचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकतो.
गुजरात आणि चेन्नईचे संघ टॉप दोन संघ म्हणून ग्रुप स्टेजमध्ये अव्वल असतील असं चित्र सध्या दिसत आहे. हे दोन्ही संघ क्वालिफायर-1 मध्ये खेळण्याची अधिक शक्यता आहे. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये जिंकलेल्या संघाशी पुन्हा खेळण्याची संधी मिळेल.