क्रिकेट सामना सोडून चोराला पकडण्यासाठी खेळाडूंनी धाव मारली आणि...

क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एखादा तरी असा क्षण येतो, ज्यामुळं तो सामना चांगला लक्षात राहतो. 

Updated: Jul 27, 2021, 04:26 PM IST
क्रिकेट सामना सोडून चोराला पकडण्यासाठी खेळाडूंनी धाव मारली आणि...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एखादा तरी असा क्षण येतो, ज्यामुळं तो सामना चांगला लक्षात राहतो. कधी क्रीडारसिक मैदानात येतात, कधी खेळाडूंची अफलातून कामगिरी गाजते तर, कधी भलतील कारणं सामना गाजवतात. सध्या चर्चा होतेय ती अशाच एका क्रिकेट सामन्याची. जिथे एका चोराला पकडण्यासाठी क्रिकेट संघातील खेळाडूच त्याच्या मागे धावू लागले. 

इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या चेरवेल लीग क्रिकेट सामन्यामध्ये ही घटना झाली. स्टँटन हारकोर्ट क्रिकेट क्लब आणि वुल्वरकोट क्लब या दोन संघांमध्ये हा सामना खेळवला जात होता. त्याचवेळी मैदानानजीक असणाऱ्या एका बाकावर एका व्यक्तीला बसलेलं पाहिलं गेलं. जेव्हा खेळाडूंनी पाहिलं तेव्हा अनेक खेळाडू त्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी जाताना दिसू लागले. 

खेळाडू आपल्याकडे येत आहेत हे पाहूनच त्या व्यक्तीनं तेथून पळ काढण्याची तयारी दाखवली. तेव्हाच दोन्ही संघातील खेळाडूंनी वेग धरला आणि त्या व्यक्तीला गाठण्याचा प्रयत्न केला. असं म्हटलं जात आहे की, पळ काढणारा व्यक्ती खेळाडूंच्या पाकिटातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. 

India vs Sri Lanka, 2nd T20I | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला कोरोना, दुसरा टी 20 सामना स्थगित

 

'द सन'नं या घटनेबाबत स्टँटन हारकोर्ट क्रिकेट क्लबच्या कर्णधाराशी संवाद साधत त्यासंदर्बातील वृत्त प्रसिद्ध केलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तिथं असणाऱ्या खेळाडूंपैकी एकाची शरीरयष्टी भारदस्त असल्यामुळं त्यानंच चोराला पोलीस येईपर्यंत धरुन ठेवलं. या घटनेनंतर काही काळासाठी क्रिकट सामनाही स्थगित करण्यात आला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं वय 32 वर्षे असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पुढील तपासही सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.