पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिज टीमचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे. ३५ वर्षांचा ड्वॅन ब्राव्हो गेल्या २ वर्षांपासून वेस्ट इंडिजच्या टीमचा हिस्सा नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ड्वॅन ब्राव्हो जगभरातल्या टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. ब्राव्होच्या निवृत्तीचं खरं कारण अजून समोर आलं नसलं तरी एका नव्या वादामध्ये ब्राव्हो अडकला आहे.
वेस्ट इंडिजमधली ५० ओव्हरची स्पर्धा असलेल्या सुपर ५० कपमध्ये ब्राव्होनं क्रिकेट बॉलऐवजी टेनिस बॉलनं बॉलिंग केली. या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे. मैदानातल्या या वादग्रस्त वर्तनाबद्दल मॅचच्या अधिकाऱ्यांनीही गप्प बसणंच पसंत केलं आहे.
११ ऑक्टोबरला त्रिनिदाद टोबॅगो आणि वेस्ट इंडिज बी टीममध्ये मॅच सुरू होती. ड्वॅन ब्राव्होनं एका ओव्हरमध्ये क्रिकेट बॉलऐवजी टेनिस बॉलनं बॉलिंग केली. मैदानात असलेले अंपायर जॅकलिन विलियम आणि वीएम स्मिथनं याबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही. ब्राव्होनं टाकलेल्या या बॉलना वैध मानण्यात आलं. बॅट्समन किमानी मेलियसनं टेनिस बॉलवर २ रन काढले. या रनही त्याला देण्यात आल्या. मेलियसनं आक्षेप घेतल्यानंतरही अंपायरनी याकडे लक्ष दिलं नाही.
कॉमेंट्री करणाऱ्यांनीही ब्राव्होच्या या वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले. या मॅचमध्ये त्रिनिदाद टोबॅगोचा ७० रननं विजय झाला. ड्वॅन ब्राव्होनं ८ ओव्हरमध्ये ५५ रन देऊन २ विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे वरिष्ठ प्रबंधक रोनाल्ड होल्डर यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. तर आयसीसीनं मात्र याप्रकरणावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. ही मॅच आंतरराष्ट्रीय नसल्यामुळे यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही, असं आयसीसीनं सांगितलं आहे.
ड्वॅन ब्राव्होनं २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यानं ४० टेस्ट, १६४ वनडे आणि ६६ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. १४ वर्षांपूर्वी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जेव्हा मला मरून टोपी मिळाली होती तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे, अशी प्रतिक्रिया ब्राव्होनं दिली.