'मी मोनालिसाशी लग्न करणार होते, पण...', महिला धावपटू दुती चंदने मांडली व्यथा, 'मी समलिंगी...'

सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार देत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी जाहीर केली असून, यामध्ये भारतीय महिला धावपटू दुती चंदचाही समावेश आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2023, 05:47 PM IST
'मी मोनालिसाशी लग्न करणार होते, पण...', महिला धावपटू दुती चंदने मांडली व्यथा, 'मी समलिंगी...' title=

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली जाणार की नाही यासाठी सोमवारी संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे होतं. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान समलिंगींना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत हे स्पष्ट करताना विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास मात्र नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी वर्तवली असून यामध्ये भारतीय महिला धावपटू दुती चंदचाही समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण असंतृष्ट असल्याचं तिने सांगितलं आहे. 

"मला माझी जोडीदार मोनालिसाशी लग्न करायचं आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे माझ्या सर्व योजनांवर पाणी फेरलं आहे. मी 5 वर्षांपासून मोनालिसासोबत राहत आहे. आम्ही एकत्र आनंदी असून, एक प्रौढ नागरिक या नात्याने आपले निर्णय स्वत: घेण्याचा अधिकार आहे. आतता संसद समलिंगी विवाहासंबंधी कायदा संमत करेल अशी आशा," असल्याचं दुती चंदने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हटलं. 

मे 2019 मध्ये दुती चंद ही पहिली समलिंगी भारतीय खेळाडू ठरली. तिने समलिंगी संबंधात असल्याचं जाहीर केल्यानंतर तिला आणि कुटुंबाला टीकेचा सामना करावा लागला होता. 2021 मध्ये, दुती चंदने बर्मिंगहॅममधील क्वीन्स बॅटनमध्ये भाग घेतला होता. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात तिने LGBTQIA+ ध्वज हातात घेत जगाला संदेश दिला होता. 

दुतीने 2015 मध्ये क्रीडा लवादाच्या कोर्टात अपील करून IAAF विरुद्ध ऐतिहासिक खटला जिंकला होता. एका वर्षासाठी निलंबित केल्यानंतर तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली होती. 

दुती आणि मोनालिसा गेल्या काही वर्षांपासून संबंधात आहेत. ही जोडी कादंबिनी या ओडिया मासिकाच्या मुखपृष्ठावरही झळकली होती. मोनालिसा पहिल्यांदा तिच्या गावात खुदुरकुनी पूजेदरम्यान दुतीला भेटली होती. बीएची पदवी पूर्ण केल्यानंतर हे जोडपे एकत्र राहणार आहे. दरम्यान नात्याला विरोध करणाऱ्या दुतीच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलं आहे.