संसाराच्या विकेटवर इमरान खान स्वस्तात आऊट, कुत्र्यामुळे मोडलं तिसरं लग्न

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा अध्यक्ष इमरान खानचं तिसरं लग्न मोडलं आहे.

Updated: Apr 25, 2018, 06:33 PM IST
संसाराच्या विकेटवर इमरान खान स्वस्तात आऊट, कुत्र्यामुळे मोडलं तिसरं लग्न  title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा अध्यक्ष इमरान खानचं तिसरं लग्न मोडलं आहे. दोनच महिन्यांपूर्वी इमरान खानचं बुशरा मानेकासोबत लग्न झालं होतं. त्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. इमरान खानचं हे तिसरं लग्न होतं. पण पाकिस्तानच्या मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार बुशरा मानेका इमरान खानचं घर सोडून तिच्या माहेरी गेली आहे.

कुत्र्यामुळे मोडला संसार

इमरान खानच्या पाळलेल्या कुत्र्यांमुळे या दोघांचा संसार मोडला आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल पण पाकिस्तानी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इस्लामाबादनं दिलेल्या वृत्तानुसार बुशरा इमरान खानच्या कुत्र्यांपासून हैराण होती. लग्न झाल्यावर कुत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवीन असं इमराननं बुशराला लग्नाआधी सांगितलं होतं. इमराननं सुरुवातीला त्याचे कुत्रे दुसरीकडे पाठवलेही पण थोड्या कालावधीनंतर हे कुत्रे तो पुन्हा घरी घेऊन आला. तेव्हापासून इमरान आणि बुशराच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. हे कुत्रे दिवसभर घरात फिरतात आणि घाण करतात, असा आरोप बुशरानं केला.

बुशरा मानेका धार्मिक

इमरानची तिसरी पत्नी बुशरा मानेका ही धार्मिक आहे. त्यामुळे तिनं कुत्र्यांना घरात ठेवायला विरोध केला. धार्मिक कार्यक्रम करताना या कुत्र्यांचा त्रास होतो, असं बुशरानं इमरानला सांगितलं. याआधी इमरान खाननं त्याचा कुत्रा शेरूला घराबाहेर काढल्याच्या बातम्यांचं खंडन केलं होतं. शेरू हा कुत्रा काही वर्षांपूर्वीच मेला आहे, असं इमरान खान म्हणाला होता.

बुशराचा मुलगा इमरानच्या घरी

मीडिया रिपोर्टनुसार बुशराच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा इमरानसोबत राहणार नाही हे आधीच ठरलं होतं. पण बुशराच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा खवर फरीद अनेक दिवसांपासून इमरान खानच्या घरी राहत होता. या गोष्टीमुळेही इमरान आणि बुशराच्या नात्यात दुरावा आला. इमरानची दुसरी पत्नी बीबीसीची माजी पत्रकार होती. रेहमचा मुलगाही इमरानच्या घरी राहिल्यामुळे या दोघांचा घटस्पोट झाल्याचं बोललं जातं.