लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली.
सराव सामन्यात सर्वांनी फलंदाजीची संधी मिळावी यासाठी त्याला रिटायर्ट आऊट करण्यात आले. त्यामुळे त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
भारताची खराब सुरूवात झाली, सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले होते. त्यानंतर शिखर धवनची साथ द्यायला आलेल्या दिनेश कार्तिकने ८ चौकार आणि आणि एक षटकारासह ९४ धावांची शानदार खेळी केली.
मनीष पांडे जखमी झाल्यामुळे १५ जणांच्या संघात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याला अपयश आले होते. तो शून्यावर बाद झाला होता. पण आज त्याने संधीचे सोने केले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केले. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा १ धावेवर बाद झाला. आयपीएलचा खराब फॉर्म आजही रोहितचा कायम राहिला. त्याला रुबेल याने क्लिन बोल्ड केले.
त्यानंतर शिखरच्या साथीला आलेला अजिंक्य राहणे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एक शानदार स्ट्रेट ड्राइव्ह चौकारही लगावला. पण त्याला मुस्तफिजुर याने क्लिन बोल्ड केले. त्याने २१ चेंडूत ११ धावा काढल्या.
शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फॉर्म कायम ठेवत ६७ चेंडूत ७ चौकारांसह ६० धावा केल्या. केदार जाधव यानेही चांगळी फलंदाजी केली पण त्याला जास्त धावा करता आल्या नाही. त्याने ३८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकारसह ३१ धावा केल्या.
सध्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा खेळत असून त्यांनी अनुक्रमे ५६ आणि ३१ धावा केल्या आहेत.