धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता, शास्त्रींचं वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: Jan 10, 2020, 08:26 AM IST
धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता, शास्त्रींचं वक्तव्य title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी टेस्ट क्रिकेट खेळत नाही. वनडे क्रिकेटमध्येही तो निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. टी-२० या एकाच फॉरमॅटमध्ये धोनीला खेळण्याची इच्छा असेल, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

'धोनीला टी-२० क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला पुन्हा मैदानात यावं लागेल. तो आयपीएलमध्ये नक्कीच खेळेल. त्यावेळी धोनीचं शरीर काय प्रतिक्रिया देतंय हे आम्ही पाहू', असं शास्त्री म्हणाले आहेत. धोनीच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर त्याची टी-२० वर्ल्ड कपमधली निवड अवलंबून आहे, असं शास्त्रींनी सांगितलं.

दुसरे विकेट कीपर नेमकं काय करतायत आणि त्यांचा बॅटिंग फॉर्म कसा आहे. तसंच धोनीची कामगिरी कशी आहे, हेदेखील आम्हाला पाहायला लागेल. टी-२० वर्ल्ड कपआधी आयपीएल ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. आयपीएलनंतरच वर्ल्ड कपसाठीचे १५ खेळाडू जवळपास निश्चित होतील, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. मध्ये काही काळ धोनी लष्करी सेवा करण्यासाठीही गेला होता. भारताचा वेस्ट इंडिज दौरा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातही धोनी दिसला नाही. २०२० च्या नव्या वर्षात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठीही धोनीची निवड झालेली नाही.