दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघाला हरवून जेतेपद पटकावले. चेन्नईने सलामीवीर फाफ डु प्लेसिसच्या (faf du plessis) शानदार अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर 192 धावांचा मोठा डोंगर उभा केला. व्यंकटेश अय्यर (venkatesh iyer) आणि शुभमन गिल (shubman gill) यांच्या चांगल्या सुरवातीचा फायदा कोलकाताच्या संघाने घेतला नाही आणि संघाला फक्त 165 धावाच करता आल्या.
महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईने चौथे आयपीएल जेतेपद पटकावले. जिंकल्यानंतर धोनी म्हणाला, "मी चेन्नई संघाबद्दल बोलण्यापूर्वी कोलकाता संघाबद्दल बोलणे खूप महत्वाचे आहे."
भारतात सुरू झालेल्या आयपीएलच्या या हंगामाच्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये कोलकाता संघाने फक्त दोन सामने जिंकले होते. यूएईमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या लेगमध्ये, संघाने पाच विजयांसह उर्वरित 7 सामन्यांमधून 14 गुण मिळवले. चांगल्या रन रेटच्या आधारावर मुंबई इंडियन्सला (MI) मागे टाकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. एलिमिनेटरमध्ये, संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) पराभूत केले आणि नंतर क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव केला.
धोनी पुढे म्हणाला, "पहिल्या टप्प्यात असल्याने कोणत्याही संघाला अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण झाले असते. या स्पर्धेत एक संघ म्हणून त्यांनी जे साध्य केले ते आश्चर्यकारक होते. या वर्षी जिंकण्यासाठी योग्य असा कोणता संघ होता तर तो केकेआर होता.'