मुंबई : भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं नाव बीसीसीआयनं आपल्या वार्षिक करारातून वगळलंय. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी...१९८३नंतर प्रथमच भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा यशस्वी कॅप्टन... धडाकेबाज बॅट्समन आणि चपळ विकेटकीपर...
मात्र २०१९च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये रनरेट कमी ठेवून मोक्याच्या क्षणी आऊट झाल्यामुळे धोनीवर टीका झाली होती. त्यानंतर त्याला विश्रांतीच्या नावाखाली संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर तो ब्लू जर्सीमध्ये दिसलेलाच नाही.
आता तर धोनीसोबत असलेला करारही बीसीसीआयनं संपुष्टात आणला आहे. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या वर्षाची करार यादी बीसीसीआयनं गुरूवारी जाहीर केली.
या यादीमध्ये A+ श्रेणीत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी स्थान कायम राखलंय...
A ग्रेडमध्ये आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत यांची नावं आहेत...ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना ७ कोटी मानधन असेल. तर ए ग्रेडसाठी ५ कोटी, बी ग्रेडसाठी ३ कोटी आणि सी ग्रेडमधील क्रिकेटर्सना १ कोटी मानधन असेल...
यादीमध्ये मयांक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी प्रथमच एंट्री केली आहे.
गेल्यावेळी ए श्रेणीत असलेल्या माहीला मात्र आता वगळण्यात आलंय... वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर धोनी एकही वन-डे किंवा टी-२० मॅच खेळलेला नाही.
धोनीची किंवा कोणत्याही खेळाडूची संघातील निवड ही केवळ कामगिरीच्या आधारेच असेल, असं निवड समितीचे प्रमुख व्यंकटेश प्रसाद यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं.
तर आता बीसीसीआयनंही धोनीसोबत करार संपवल्यामुळे त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्त होण्याचा सल्ला दिल्याचं मानलं जातंय.. आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल काय निर्णय घेतो याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.