धोनीच्या नाही तर या टीमला सपोर्ट करते झिवा

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईनं फक्त दोन वर्षांनी कमबॅकच केलं नाही तर ट्रॉफीही पटकवली.

Updated: Jul 22, 2018, 09:05 PM IST
धोनीच्या नाही तर या टीमला सपोर्ट करते झिवा title=

मुंबई : यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईनं फक्त दोन वर्षांनी कमबॅकच केलं नाही तर ट्रॉफीही पटकवली. या मोसमामध्ये धोनीची मुलगी झिवाचे चेन्नई टीमसोबतचे अनेक व्हिडिओही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. चेन्नईच्या मॅचवेळी झिवा साक्षीसोबत अनेकवेळा स्टेडियममध्येही दिसली. पण झिवाला वडिलांची चेन्नई नाही तर रोहित शर्माची मुंबईची टीम आवडते. रोहित शर्मानं झिवाचा मुंबईच्या टीमला सपोर्ट करणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटमध्ये रोहितनं धोनी, साक्षी आणि मुंबईच्या ऑफिशिअल ट्विटवर हॅण्डलला टॅग केलं आहे. मुंबईच्या टीमला नवीन फॅन मिळाला आहे, असं या ट्विटमध्ये रोहित म्हणाला आहे.

टेस्ट टीममध्ये रोहित नाही

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहितची निवड झालेली नाही. अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव टेस्ट आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्येही रोहितला संधी देण्यात आलेली नव्हती. रोहितनं आत्तापर्यंत २५ टेस्टच्या ४३ इनिंगमध्ये ३९.९७ च्या सरासरीनं १,४७९ रन केल्या. यामध्ये ३ शतकं आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचमध्ये रोहितनं ११, १०, १० आणि ४७ रन केल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्य नसल्यामुळेच रोहितला टेस्ट टीममध्ये संधी मिळत नसल्याचं बोललं जात आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्यानंतरही रोहितनं एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली होती. आता मी कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे, जिकडे टेस्ट क्रिकेटचा विचार करणं सोडून दिलं आहे, असं रोहित म्हणाला होता.

धोनीवरही टीका

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संथ बॅटिंग केल्यामुळे धोनीवर टीकेची झोड उठली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. तर दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.