प्ले ऑफच्या प्रवेशाचं मुंबईचं स्वप्न भंगलं, दिल्लीकडून पराभव

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबईचं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Updated: May 20, 2018, 08:18 PM IST
प्ले ऑफच्या प्रवेशाचं मुंबईचं स्वप्न भंगलं, दिल्लीकडून पराभव  title=

नवी दिल्ली : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबईचं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. दिल्लीनं ठेवलेल्या १७५ रनचा पाठलाग करताना मुंबईची टीम १६३ रनवर ऑल आऊट झाली. मुंबईकडून एव्हिन लुईसनं सर्वाधिक ४८ रन केल्या. तर बेन कटिंगनं २० बॉलमध्ये ३७ रन करून मुंबईला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. पण २० व्या ओव्हरला कटिंगची विकेट पडल्यामुळे मुंबईच्या आशा संपुष्टात आल्या. दिल्लीच्या दोन्ही लेग स्पिनरनी मुंबईच्या बॅटिंगला खिंडार पाडली. संदीप लमीचने, अमित मिश्राला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर फास्ट बॉलर हर्षल पटेललाही ३ विकेट घेण्यात यश आलं. ट्रेन्ट बोल्टला मुंबईची एक विकेट मिळाली.

या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दिल्लीला २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १७४ रन करता आल्या. दिल्लीच्या ऋषभ पंतनं ४४ बॉलमध्ये ६४ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. विजय शंकरनं ३० बॉलमध्ये नाबाद ४३ रन केल्या. शंकरनं ३ फोर आणि २ सिक्स लगावल्या. मुंबईकडून कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मयंक मार्कंडेला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.