इंग्लंड : दीप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला रनआऊट केल्याचं प्रकरण अद्याप शांत होताना दिसत नाहीये. भारतासोबतच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर चार्ली डीनला रनआऊट करण्यापूर्वी दीप्तीने तिला चेतावणी दिल्याच्या वक्तव्यावर इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने विधान केलंय. यावरून तिने टीम इंडियाच्या खेळाडू आणि दीप्ती यांच्यावर खोटं बोलण्याचा आरोप लावलाय.
दीप्ती शर्माने सांगितलं की, इंग्लंडची शेवटची फलंदाज डीन (47) रनआऊट केलं कारण ती बॉलिंग एंडला चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझपासून खूप दूर गेली होती.
डीनला अशाप्रकारे रनआऊट केल्याने इंग्लंडची महिला टीम नाराज होती आणि यानंतर 'खेळाडूवत्तीवर'ची चर्चा सुरू झाली. मायदेशी परतल्यानंतर दीप्तीने सोमवारी खुलासा केला की, चार्ली डीनला रनआऊट करण्यापूर्वी अनेक वेळा क्रीजमधून बाहेर पडण्याबाबत इशारा देण्यात आला होती. मात्र कर्णधार नाइटने अनेक ट्विटमध्ये दीप्तीचा दावा फेटाळून लावला आहे.
या प्रकरणावरून जगभरात एक नवी चर्चा सुरू झालीये आहे, जे थांबण्याचं नाव घेत नाही आहे. हे प्रकरण मंकडिंगशी जोडलं जातंय. सोशल मीडियावरही याबाबत सतत चर्चा सुरूये.
नाइटने ट्विटरवर लिहिले की, “सामना संपला. चार्लीला कायदेशीररीत्या रनआऊट करण्यात आलं. भारत हा सामना आणि मालिका जिंकण्यास पात्र होता पण कोणताही इशारा देण्यात आला नाही. रनआऊट होण्याच्या निर्णयाने त्यांना सोयीस्कर वाटत असेल तर भारताने इशाऱ्याबद्दल खोटं बोलून समर्थन करण्याची गरज भासू नये."