मुंबई : काल संध्याकाळी संपूर्ण जल्लोषात आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला. यामुळे रविंद्र जडेला पहिल्याच परिक्षेत नापास झाला आहे. दरम्यान या सामन्यात जडेजाकडून एक मोठी चूकंही झाली आहे.
15 वा सिझन सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नईची कमान रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली. तर कालच्या पहिल्याच सामन्यात जडेजाच्या एका मोठ्या चुकीचा फटका चेन्नईच्या टीमला भोगावा लागला आहे.
कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जडेजाच्या चुकीमुळे अंबाती रायडू रन आऊट झाला. नवव्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. सुनील नरीनच्या बॉलवर जडेजाने बॅकफूटवर जाऊन पुश केलं. यावेळी नॉन स्ट्राईकवरून रायडू रन घेण्यासाठी धावला. रायडून क्रिजपासून फार दूर आला होता. मात्र जडेजाने रन घेतला नाही. परिणामी या गोंधळामध्ये रायडू रनआऊट झाला.
कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 रन्सचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळा अंजिक्य रहाणे विजयाचा शिल्पकार ठरला आहे.