मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तान. एकमेकांच्या कट्टर पांरपरिक प्रतिस्पर्धी. तसेच आशिया खंडातील महत्वाच्या टीमपैकी २ टीम. या दोन्ही टीमसाठी २००७ मधील ५० ओव्हरचा वर्ल्डकपच्या आठवणी फार वेदनादायक आहेत. या वर्ल्डकपचे वेस्टइंडिजमध्ये आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. टीम इंडियाला दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशकडून झालेला पराभव टीम इंडियाला पचनी पडला नव्हता.
तेव्हाच्या म्हणजेच २००७ च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे दिग्गज खेळा़डू खेळत होते. बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वपन साखळी फेरीतच धुळीस मिळाले होते.
पाकिस्तान तत्काकालीन प्रशिक्षक हे बॉब वूल्मर होते. अचानक बॉब वूल्मर यांचा हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला, त्यामुळे एकच खळबळ माजली होती. क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली होती.
दरम्यान त्याच दिवशी पाकिस्तानवर दुबळ्या आयर्लंडकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. आधीच आपला प्रशिक्षक गमावल्याची खंत, त्यात आयर्लंडकडून पराभव. तो दिवस पाकिस्तान टीम आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी काळा दिवस ठरला.
आयर्लंडकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे आव्हान देखील संपले होते. इंडिया-पाकिस्तान या दोन कडवट टीमना सुपर-८ मध्ये देखील पोहचता आले नव्हते. टीम इंडियाला साखळी फेरीतील ३ पैकी २ सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. टीम इंडियाला श्रीलंका आणि बांगलादेशने पराभूत केले.
वेस्टइंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २००७ च्या वर्ल्डकपमध्ये ही स्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फायनलमध्ये टीम श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने धडक मारली होती. अगदी १९९६ च्या वर्ल्डकपप्रमाणे. परंतु या वेळेस टीम ऑस्ट्रेलियाने १९९६ च्या वर्ल्कप फायनलचा श्रीलंकेविरुद्ध वचपा काढला होता. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा २००७ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव केला.
पावसाच्या व्यत्ययामुळे २००७ ची फायनल मॅच ३८ ओव्हर खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. रिकी पॉटिंग हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. ऑस्ट्रेलियाने ३८ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून धमाकेदार २८१ रन कुटल्या. विकेटकीपर एडम ग्रिलख्रिस्टने ताबडतोड शतकी कामगिरी केली. त्याने १०४ बॉलमध्ये १४९ रन केल्या.
मॅचदरम्यान पावसाचा व्यत्यय सुरुच होता. पहिली इनिंग संपल्यानंतर पाऊस एकदा धडकला. वेळेची भरपाई काढण्यासाठी मॅचमधील २ ओव्हर आणखी कमी करण्यात आल्या. म्हणजेच आता मॅच ३६ ओव्हरची करण्यात आली. ओव्हर कमी केल्यामुळे आता श्रीलंकेला ३६ ओव्हमध्ये २६९ रनचे नव्याने आव्हान मिळाले होते.
श्रीलंकेला या मोबदल्यात ३६ ओव्हरमध्ये २१५ रनच करता आल्या. त्यामुळे श्रीलंकेचा ५३ रनांच्या फरकाने पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप ट्रॉफीवर चौथ्यांदा आपले नाव कोरले.