World Cup 2019: अफगाणिस्तानचा पेपर श्रीलंकेला सोप्पा जाणार?

याअगोदर, न्यूझीलंडनं श्रीलंकेचा धुव्वा उडवला तर अफगाणिस्तानला तगड्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय

Updated: Jun 4, 2019, 12:48 PM IST
World Cup 2019: अफगाणिस्तानचा पेपर श्रीलंकेला सोप्पा जाणार? title=

मुंबई : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा सामना दुबळ्या अफगाणिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंकेसाठी सोपा पेपर असला तरी अफगाणिस्तानमध्ये लंकेला धक्का देण्याची क्षमता आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान आणि श्रीलंकन संघाची सुरूवात निराशाजनक झाली. न्यूझीलंडनं श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता तर अफगाणिस्तानला तगड्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ मैदानात विजयाचे लक्ष्य ठेवूनच उतरतील. श्रीलंकेच्या ताफ्यात लाहिरू थिरिमने, दिमूथ करूणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरासारखे मोठी खेळी करणारे फलंदाज असूनही त्यांना पहिल्या सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयश आलंय. लसिथ मलिंगासारखा अनुभवी गोलंदाजही न्यूझीलंडच्या फलंदाजांना लगाम घालू शकला नव्हता. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात लंकेला संपूर्ण ताकदीनिशी उतरावं लागेल. 

अफगाणिस्तानला तगड्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अफगाणिस्तानला पहिलाच पेपर एकदम कठीण आला  होता. पण त्यांनी कांगारुंच्या गोलंदाजांचा नेटानं मुकाबला केला. अफगाणिस्तानकडे मोहम्मद शहजाद, मोहम्मद नाबीसारखे स्टार फलंदाज आहेत. राशिद खानसारखा अष्टपैलू खेळाडू मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करुन धावसंख्या वाढवू शकतो तसंच आपल्या फिरकी गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवू शकतो.

विश्वचषकामध्ये हे दोन्ही संघ एकदाच आमने-सामने आले आहेत. या एकमेव सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारलीय. तर अफगाणिस्तानच्या पदरी पराभव पडलाय. श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ३ लढती झाल्या आहेत. यातील दोन सामने लंकेनं तर एक सामना अफगाणिस्ताननं जिंकलाय. 

२०१८ आशियाई चषकामध्ये अफगाणिस्ताननं आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला स्पर्धेतून गाशा गुंडाळायला भाग पाडलं होतं. अफगाणिस्ताननं श्रीलंकेला पराभूत केलं तर आश्चर्य वाटायला नको. तर आता श्रीलंकेला किमान अफगाणिस्तासनसमोर तरी सूर गवसतो का हे पाहावं लागेल.