भारत-पाकिस्तानदरम्यान आज हायव्होल्टेज सामना, मेगाफायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

WCL 2024 Ind vs Pak Final : भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. आज वर्ल्ड चॅम्पयिशप ऑफ लिजेंडची मेगाफायनल रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तानने वेस्टइंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलीय.

राजीव कासले | Updated: Jul 13, 2024, 03:46 PM IST
भारत-पाकिस्तानदरम्यान आज हायव्होल्टेज सामना, मेगाफायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज title=

WCL 2024 Ind vs Pak Final : भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हायव्होल्टेज मेगाफायनल (Mega Final) रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तानने वेस्टइंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलीय. ही मेगाफायनल आयसीसी किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची नाही तर निवृत्त सीनिअर खेळाडूंच्या वर्ल्ड चॅम्पियन्सशिप ऑफ लेजेंड्सची (World Championship Of Legends) आहे.  माजी दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया आणि युनुस खानच्या (Younis Khan) नेतृत्वात खेळणारा पाकिस्तानचा संघ एकमेकांना भिडणार आहेत. 

भारत-पाकिस्तान मेगाफायनल
भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड चॅम्पियन्सशिप ऑफ लेजेंड्सचा अंतिम सामना इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात युवराज सिंग सात वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाच्या संघात युवराज सिंगही होता. या सामन्यात युवराजने 31 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. पण टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. 

आता सात दिवसांपूर्वीच झालेल्या  WCL 2024 सामन्यातही पाकिस्तानने टीम इंडियाचा 68 धावांनी पराभव केला होता. हा सामनाही इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळवला गेला होता. 

बदला घेण्याची संधी
आता सात वर्ष आणि सात दिवसांचा बदला घेण्याची संधी युवराजच्या टीम इंडियाकडे आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करत इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालीय. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने चौकार षटकारांची बरसात केली होती. आता अंतिम सामन्यातही युवराज सिंगकडून अशाच खेळीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते बाळगून आहेत.