Lady Bumrah Video : क्रिकेट जगतातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांमध्ये भारती क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) गणना होते. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकून दिला. बुमराहच्या गोलंदाजीसमोर भल्या-भल्या फलंदाजांची भंबेरी उडते. आजच्या घडीला बुमराहच्या तोडीस तोड गोलंदाज सापडणं कठिण आहे. बुमराहच्या यॉर्करला तोंड देणं दिग्गज फलंदाजांनाही कठिण जातं. बुमराहची बॉलिंग अॅक्शन एकदम हटके आहे. त्याची बॉलिंग अॅक्शन कॉपी करण्याची तरुण गोलंदाजांमध्ये चढाओढ असते. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगी गोलंदाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलीची बॉलिंग अॅक्शन हुबेहुब बुम बुम बुमराहसारखी आहे.
कोण आहे 'लेडी बुमराह'
सोशल मीडियावर लेडी बुमराहचा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहते थक्क झालेत. बुमराहची बॉलिंग अॅक्शन एकदम हटके आहे. त्यामुळे त्याची नकल करणं खूप कठिण गोष्ट आहे. पण या मुलीची बॉलिंग अॅक्शन पाहून तुम्हाला बुमराहची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. शाळेच्या ड्रेसवर गोलंदाजी करताना या मुलीने बुमराहची हुबेहुब स्टाईल केली आहे. केवळ अॅक्शनच नाही तर तिच्या गोलंदाजीचा वेगही हैराण करणारा आहे. गोलंदाजीसाठीचा तिचा रनअपही बुमराहसारखाच आहे.
ही मुलगी एका नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या गोलंदाजीसमोर खेळताना फलंदाजही अडखळताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मुलीचं नाव मायरा जैन असं आहे. मायरा बंगळुरुमध्ये राहाते. मायरा लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे आणि जसप्रीत बुमराह तिचा आयडॉल आहे.
सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर आणि इन्स्टाग्राम रिल्सवर मायराच्या गोलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. टीम इंडियाला लेडी बुमराह (Lady Bumrah) सापडली अशी प्रतिक्रया या व्हिडिओवर उमटतायत. योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन भेटला तरी या मुलीचं भवितव्य उज्ज्वल असल्याची प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिलीय.
The Impact and Influence of Jasprit Bumrah.
- A young girl bowling in the Jasprit Bumrah's action. pic.twitter.com/zRTu8mZvIJ
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 17, 2024
जसप्रीत बुमराहला विश्रांती
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिम्बाब्वे दौरा आणि श्रीलंका दौऱ्यातही जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही बुमराह खेळण्याची शक्यता कमीच आहे.
बुमराह टीम इंडियाच्या तीनही क्रिकेट फॉर्मेंटचा प्रमुख गोलंदाज आहे. आतापर्यंत बुमराह 36 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय आहे. कसोटीत 159 एकदवसीय क्रिकेटमध्ये 149 आणि टी20 क्रिकेटमध्ये 89 विकेट बुमराहच्या नावावर आहेत.