राहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार?

Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आयपीएलच्या नव्या हंगामात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते.  

राजीव कासले | Updated: Aug 22, 2024, 05:50 PM IST
राहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार? title=

Rahul Dravid In Bollywood : राहुल द्रविड यांना खेळाडू म्हणून पाहिलं, नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या (NCA) संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना पाहिलं, आयपीएलमध्ये कर्णधापदही सांभाळलं आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हमूनही त्यांनी धुरा सांभाळली. आता राहुल द्रविड (Rahul Dravid) एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राहुल द्रविड यांची लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री होण्याची शक्यता आहे. स्वत: राहुल द्रविड यांनी तसे संकेत दिले आहेत. कोणत्या चित्रपटात काम करायला आवडेल याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. पण मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी एक अट ठेवली आहे. 

CEAT अवॉर्ड कार्यक्रमात द्रविड यांची मुलाखत
सीएट अवॉर्ड कार्यक्रमात टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राहुल द्रविड यांनी चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. वास्तविक राहुल द्रविड यांना त्यांच्या बायोपिक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एका अटीवर आपण चित्रपटात काम करण्याचे संकेत दिले.

'पैसे चांगले मिळाल्यास काम करणार'
राहुल द्रविड यांच्यावर बायोपिक बनला तर यात कोणत्या अभिनेत्याला पाहण्यास आवडेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच राहुल द्रविड यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. त्यानंतर उत्तर देताना त्यांनी चांगले पैसे मिळाले तर मीच माझ्या बायोपिकमध्ये काम करेन असं उत्तर दिलं. 

यावरुन राहुल द्रविड लवकरच बॉलिवूडमध्ये दिसू शकतात अशी चर्चा रंगली आहे. पण यासाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आता लवकरच राहुल द्रविड यांचाी बायोपिक दिसू शकतो. 

टी20 वर्ल्ड कपनंतर बेरोजगार
2024 मध्ये झालेला टी20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं. विजेत्या टीम इंडियाला राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. यानंतर एका मुलाखतीत बोलताना राहुल द्रविड यांनी आता आपण बेरोजगार असल्याचं म्हटलं होतं. हे त्यांचं वाक्य चांगलंच गाजलं. आता राहुल द्रविड लवकरच आयपीएलच्या नव्या हंगामात एका संघाच्या प्रशिक्षकपदी दिसू शकतात.