'अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे...' सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावूक करणारा किस्सा

रणजी क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करुनही मुंबई क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सरफराज खान याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. काय कारण आहे सरफाराजला वगळण्याचं?

Updated: Feb 1, 2023, 01:53 PM IST
'अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे...' सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावूक करणारा किस्सा title=

Sarfaraj Khan : मुंबई रणजी क्रिकेट (Mumbai Ranji Team) संघाचा फलंदाज सरफराज खान याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) गेल्या दोन हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या दोनही हंगामात सरफराजने 900 हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या रणजीत स्पर्धेतही सरफराजने (sarfaraz khan) आपल्या खेळीने टीम इंडियाचे (Team India) दरवाजे ठोठावलेत. 25 वर्षांच्या सरफराजने सहा सामन्यात तीन शतकं लगावली आहेत. सरफराजच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळेल अशी चर्चा सुरु झाली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात त्याला संधी देण्यात आलेली नाही. (India vs Australia Test Series) 

सरफराजला टीम इंडियातून डावललं
सरफराजला डावलल्याने भारतीय निवड समितीवर (India Selection Committee) मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतके ठोकणाऱ्या टीम इंडियामध्ये (Team India) प्रवेश का मिळत नाही, असा दबाव त्याच्या चाहत्यांकडून बीबीसीआयवर वाढत आहे. सरफराज अजून लहान असल्याचा युक्तीवाद केला जात आहे. पण वास्तविक त्याच्यापेक्षा लहान खेळाडूही सध्या टीम इंडियात खेळत आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, इशान किशन सारखे खेळाडू देखील याच वयोगटातील आहेत.

नौशादने सांगितला 'तो' किस्सा
सरफराजचा त्याचे वडिल नौशाद खान (Nausahd Khan) याच्याबरोबर चांगला बॉन्डिंग आहे. नौशाद हे आपल्या मुलाचे प्रशिक्षकही आहेत. नुकताच नौशाद खान यांनी भावूक करणारा एक किस्सा मुलाखातीत सांगितला. मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा सरफराज हा मुळचा उत्तर प्रदेशमधल्या आझमगड जिल्ह्यातला आहे. सरफराज ज्युनिअर संघातून खेळताना त्याच्याबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरही (Arjun Tendulkar) खेळत होता. 

एकदिवस सरफराज जवळ आला आणि म्हणाला अब्बू अर्जुन किती नशीबवान आहे. त्याच्याजवळ सर्वकाही आहे. कार आहे, आयपॅड आहे, त्यावेळी आपण किती असहाय्य आहोत याची जाणीव झाल्याचं नौशाद खान यांनी सांगितलं. पण त्यानंतर सरफराजने मला मिठी मारली आणि म्हटलं मी जास्त नशीबवान आहे, कारण माझ्याजवळ अब्बू आहेत. माझ्याबरोबर तुम्ही संपूर्ण दिवस असतात. जास्तवेळ माझ्याबरोबर घालवता, त्यावेळी मला सरफराजचा अभिमान वाटला असा भावनिक किस्सा नौशाद खान यांनी आपल्या मुलाखतीत सांगितला.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेकॉर्ड
सर्फराजने आतापर्यंत 36 फर्स्ट क्रिकेट सामान्यात 80 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तब्बल 3380 धावा त्याच्या नावावर असून यात 12 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे 301 नाबाद. धावा करण्याची त्याची क्षमता आणि संयम हा कसोटी क्रिकेटसाठी एकदम योग्य असल्याचं दिग्गज क्रिकेटरही मान्य करतात. 2009 मध्ये 12 वर्षांच्या सर्फराजने हॅरिस शील्ड ट्रॉफी स्पर्धेत 439 धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे तो रातोरात स्टार झाला होता. सर्वांची नजर मुंबईच्या या युवा फलंदाजांवर होती. सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराजने आपल्या कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील मुंबईत संघात संधी मिळाली आणि बघता-बघता भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघापर्यंत त्याने धडक मारली. 

सर्फराजच्या वडिलांचा संघर्ष
सर्फराजचे वडिल नौशाद खान (Naushad Khan) मुंबईचे प्रसिद्ध क्रिकेटर होते. त्यांनी स्थानिक सामन्यात अनेक चांगल्या खेळी केल्या. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेपर्यंत तो पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलाने हे आपलं स्वप्न पूर्ण करावं यासाठी त्यांनी सर्फराजवर अथक मेहनत घेतली. नौशाद खान यांनी स्वत: सर्फराजला क्रिकेटचं मार्गदर्शन केलं. नौशाद खान यांची मुंबईत क्रिकेट अकॅडमी आहे. यात सर्फराजशिवाय कामरान खान, इक्बाल अब्दुल्ला असे दर्जेदार क्रिकेटपटू घडले. 

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
सर्फराज खाने आयपीएलमध्येही (IPL) आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवली आहे. अवघ्या 17 व्या वर्षात तो रॉयल चॅलेंजर बंगळुरुसाठी (RCB) खेळला. आयपीएलमधला तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. पहिल्याच सामन्यात त्याने 7 चेंडूत 11 धावा केल्या होत्या. पण पुढच्याच सामन्यात त्याने 21 चेंडूत 45 धावा करत आपलं महत्व पटवून दिलं होतं. आता सर्फराज दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळतो. पण आजही त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.