Rishabh Pant Century : भारत आणि बांगलादेशदरम्यान खेळवल्या जात असलेल्या चेन्नई कसोटीत (Chennai Test) टीम इंडियाचा (Team India) विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) शानदार शतक झळकावलं आहे. 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उतरला आहे. पहिल्या डावात पंतने 39 धावा केल्यात होत्या. पण दुसऱ्या डावात पंतने शानदार शतक ठोकलं. अवघ्या 128 चेंडूत पंतने 109 धावांची खेळी केली. यात पंतने 4 षटकार आणि 13 चौकारांची बरसात केली. या शतकी खेळीचा पंतला डबल फायदा होण्याची शक्यता आहे.
पंतला डबल धमाका
शतकी खेळीमुळे पंतला आयपीएल 2025 मध्ये फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा दुसऱ्या खेळाडूकडे जाणार अशी चर्चा रंगली होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागताना दिसतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सने पुढच्या हंगामासाठीही ऋषभ पंतलाच कर्णधार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर त्याच्या मानधनातही वाढ होण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील शतकानंतर पंतसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
पंतला करणार रिटेन
क्रिकबजने केलेल्या एका रिपोर्टनुसार दिल्ली कॅपिटल्सची फ्रँचाईजी ऋषभ पंतला पुढच्या हंगामासाठी रिटेन करणार आहे. रिपोर्टनुसार मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली फ्रँचाईजी ऋषभ पंतला आपला नंबर-वन-रिटेंशन ठेऊ शकते. ज्यामुळे त्याला जास्त मानधन मिळू शकतं. आयपीएलच्या पुढच्या हंगामात ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स रिलीज करणार अशा बातम्या पसरल्या होत्या. पंत पुढच्या हंगामात चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार आहे. तर दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे दिली जाऊ शकते. पण आता त्या केवळ अफवा ठरल्या आहेत.
रिपोर्टनुसार भारत-बांगलादेश मालिकेपूर्वी ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे मालक आणि जेअसडब्ल्यू स्पोर्टचे मालक पार्थ जिंदाल यांची भेट घेतली होती. या भेटीत जिंदाल यांनी पंतला आपल्या प्लानबाबत माहिती दिली. पंतनेही या प्लानवर सहमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे. 2016 मध्ये पंतने दिल्ली कॅपिटल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून पंत दिल्लीचा हिस्सा आहे. 2021 मध्ये श्रेयस अय्यला दुखापत झाल्यानंतर कर्णधारपदाची माळ ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली. कार अपघातामुळे पंत 2023 आयपीएलमध्ये खेळला नव्हता. पण 2024 आयपीएलमध्ये पुनरागमन केलं.
मानधनात होणार वाढ
आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी कर्णधारपदाबरोबरच ऋषभ पंतच्या मानधनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या पंतला प्रत्येक हंगामाचे 16 कोटा रुपये मिळतात. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर खर्च करण्याची मर्यादा 95 कोटीने वाढणार आहे. याचा परिणाम खेळाडूंच्या फिसवरही पडणार आहे.