मुंबई : भारताचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजमध्ये (ODI Series) बऱ्याच वेळानंतर दुखापतीतून परतला. कमबॅक करताच भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये आपला खेळ दाखवून सगळ्यांनाच प्रभावित केले. बुधवारी आईसीसीकडून जाहीर झालेल्या वनडे रॅकिंगमध्ये गोलंदाजांच्या यादीत त्याचे स्थान नऊ क्रमांकानी वर आले. म्हणजेच आयसीसीच्या वनडे रॅकिंगमध्ये गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार 20 व्या स्थानावर होता, तो आता 11 व्या स्थानावर आला आहे. सप्टेंबर 2017 नंतरची त्याची ही सर्वोत्कृष्ट रॅकिंग आहे.
इंग्लंडबरोबर खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या सारिजमधील तिसर्या आणि निर्णायक सामन्यात भुवनेश्वरने भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने सामन्यात 42 धावा देऊन तीन बळी घेतले.
भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. त्याचे कारण आहे ते त्याचे लग्न. विवाहामुळे तो या सीरिजपासून दूर राहिला आणि म्हणूनच तो वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत एक स्थान खाली घसरून चौथ्या स्थानी आला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मॅटर हेनरी आहे. या दोघांमध्ये फक्त एका अंकाचा फरक आहे. हेनरीचे 691, तर बुमराहचे 690 गुण आहेत.
बॅट्समॅनच्या क्रमवारीत केएल राहूल 31 स्थानावरुन 27 व्या स्थानावर आला आहे. तर ऑलराउंडर हार्दिक पांड्या 42 व्या स्थानावर आणि ऋषभ पंत टॅाप 100 मध्ये करिअरच्या सर्वोत्तम क्रमांकावर पोहोचला आहे.
अंतिम सामन्यात 67 धावा देऊन चार बळी घेणारा शार्दुल ठाकूर 93 व्या स्थानावरुन 80 व्या स्थानावर आला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स बॅट्समॅनच्या क्रमवारीत 24 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टो 7व्या क्रमांकावर आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीला टी-20 रॅकिंगमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे. न्यूझीलंडच्या डेवॅान कॉनवेमुळे कोहलीला हे नुकसान सहन करावे लागले आहे. कॉनवेने या रॅकिंगमध्ये पाच स्थानांची झेप घेतली आणि तो 4 थ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कॉनवेच्या या लांब उडीमुळे विराट कोहली आणि केएल राहुल यांना प्रत्येकी एक-एक स्थान खाली जावे लागले आहे. कॉनवेच्या 4थ्या स्थानानंतर विराट कोहली 5व्या क्रमांकावर आला आहे, तर केएल राहुल 6व्या स्थानी आला आहे.