Rohit Sharma World Record : भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाला (Team India) विजयासाठी एका धावेची गरज अकताना श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज चरिथा असलंकाने सलग दोन विकेट घेत मॅच टाय केली. टीम इंडियाने जिंकता जिंकता सामना गमावला. श्रीलंकेने पहिली फलंदाजी करत 8 विकेट गमावत 230 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं. पण चांगल्या सुरुवातीनंतरही टीम इंडिया 230 धावांवर ऑलआऊट झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 75 धावांची पार्टनरशिप केली. पण त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले.
रोहित शर्माचा महाविक्रम
श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित राहिला असला तरी या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने महाविक्रमाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा क्रिकेट जगतातला तो पहिला कर्णधार ठरला आहे. सोशल मीडियावर रोहित शर्माचं कौकुत केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. पण आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधारही बनला आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 231 षटकार जमा होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीन षटकार मारताच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणार कर्णधार म्हणून मान पटकावला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार इयान मॉर्गेनच्या नावावर होता. इयान मॉर्गेनच्या नावावर कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 233 षटकार जमा होते. आता हा विक्रम रोहित शर्माने मागे टाकलाय. रोहित शर्माच्या नावार आता 234 षटकारांची नोंद झालीय.
आठ महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यात
तब्बल आठ महिन्यांनंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसलाय. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर एकदिवसीय सामने खेळला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं. आठ महिन्यांनी एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरणाऱ्या रोहितने दमदार कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने 58 धावांची खेळी केली. यात त्याने सात चौकार आणि तीन षटकारांची बरसात केली.
विराट कोहली फ्लॉप
रोहित शर्माबरोबरच टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसुद्धा आठ महिन्यांनी मैदानावर उतरला. पण त्याला मोठी खेळी करता आला नाही. विराट 24 धावा करुन बाद झाला. यात 2 चौकारांचा समावेश होता. विराटशिवाय शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरही पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरले. गिल 16 तर अय्यर 23 धावांवर बाद झाले.