कशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता येत्या 15 तारखेला तिसरा सामना रंगणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 12, 2024, 06:57 PM IST
कशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर title=

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीवासून राजकोटमध्ये (Rajkot Test) रंगणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. आता तिसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. पण त्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) तिसऱ्या कसोटीतही खेळणार नाहीए. के एल राहुल इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला होता. पण या दरम्यान त्याला दुखापत झाली.

पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान केएल राहुलच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमधून (Playing XI) त्याला वगळण्यात आलं. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी केएल राहुल फिट होईल अशी शक्या वर्तवली जात होती. पण आता ही शक्यता मावळली आहे. केएल राहुल तिसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे. 

दुखापतीमुळे सीनिअर खेळाडू बाहेर
केएल राहुलच्याआधी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाले आहेत. तर स्टार फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे इंग्लडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत खेळणार नाहीए. आता केएल राहुलच्या न खेळण्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला युवा खेळाडू घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. 

राहुल-जडेजाला फिटनेस सिद्ध करावा लागणार
केएल राहुल आणि रवींद्र जडेजा चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्याआधी त्यांना आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. बीसीसीआयने हे आधीच स्पष्ट केलं आहे. 

युवा खेळाडूंना लॉटरी लागणार
सीनिअर खेळाडू संघात नसल्याने युवा खेळाडूंना  लॉटरी लागणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज सर्फराज खान आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल टीम इंडियात पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक
3rd कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
4th कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th कसोटी सामना : 7-11 मार्च, धरमशाला