India vs Bangladesh 2nd Test: चेन्नई कसोटीतील दमदार विजयानंतर टीम इंडिया आता बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झालीय. येत्या 27 तारखेपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर (Kanpur Green Park Stadium) भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरच्या हॉटेलमध्ये टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात आलं. हॉटेलमध्ये रामधुन वाजवली जात होती, खेळाडूंच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून आणि कपाळावर टीळा लावून स्वागत करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कानपूरमध्ये चाहत्यांची गर्दी
टीम इंडियाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. हॉटेलचे कर्मचारीही खेळाडूंना भेटण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी विराट कोहलीसह खेळाडूंना फुलांचा गुच्छही दिला. तर काही कर्मचारी कोहलीबरोबर हात मिळवण्यासाठी उत्सुक होते. एका हातात बॅग आणि एका हातात फुलांचा गुच्छ धरलेल्या कोहलीने कर्मचाऱ्यांना सर माझ्याकडे दोनच हात असल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्वांचे आभार मानत विराट तिथून पुढे गेला. विराटबरोबरच कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतचंही असंच स्वागत करण्यात आलं.
Virat Kohli's welcome at the team's hotel in Kanpur. pic.twitter.com/Fqt7QkNfkX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 24, 2024
कानपूरची खेळपट्टी
भारत-बांगलादेश दरम्यानचा दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकइंफोने दिलेल्या रिपोर्टनुसार हा सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेत नाही. खेळपट्टी काहीशी सपाट असते, सामना जससजा पुढे सरकतो तशी खेळपट्टी धीमी होत जाते. चेन्नईच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत होती. त्यामुळे टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली होती.
आता काळ्या मातीची खेळपट्टी पाहाता टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा संघही तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांच्याबरोबरच डावखुला फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामला संधी मिळण्याची शक्यता आहे.
कानपूर कसोटीचा रेकॉर्ड
2021 मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळवला गेला होता. न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत भारताविरुद्धचा हा सामना ड्रॉ केला होता. त्यावेळी भारतीय संघात आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी देण्यात आली होती. ग्रीन पार्कमध्ये वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाज जास्त उपयोगी ठरु शकतात.