Champions Trophy 2025 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती चॅम्पियन्स ट्ऱॉफीची. या स्पर्धेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतलं टीम इंडियाचं वेळापत्रक (Team India Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसीच्या या स्पर्धेत 20 फेब्रुवारीपासून टीम इंडियाच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात होईल. वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील. पण टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान (Pakistan) जाणार की नाही यावर अद्याप सस्पेन्स आहे. या स्पर्धेत टीम इंडिया खेळणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
तब्बल सात वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी 2017 मध्ये ही स्पर्धा पार पडली होती. यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. नियमाप्रमाणे विजेत्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे यंदा पाकिस्तानने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
असं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्ऱॉफीतलं टीम इंडियाचं वेळापत्रक समोर आलं आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारत-न्यूझीलंड आमने सामने असतील. ग्रुप स्टेजमधला टीम इंडियाचा शेवटचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी आणि यजमान पाकिस्तानशी असणार आहे. हा सामना 1 मार्चला खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे हे तीनही सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
टीम इंडियाचं प्रस्तावित वेळापत्रक जाहीर झालं असलं तरी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाब अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याचा निर्णय भारत सरकार घेणार आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आलं आहे. पण टीम इंडियाचे सामने त्रयस्त ठिकाणी खेळण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडून ठेवला जाऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं आयोजन
चॅम्पियन्स ट्ऱॉफी 2025 चं आयोजन पाकिस्तानातल्या तीन शहरांमध्ये करण्यात आलं आहे. यात लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्ताव भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील.