क्रिस गेलचं शेवटच्या मॅचमध्ये शतक, 8 सिक्स मारून शानदार विदाई

शेवटच्या मॅचमध्ये शतक करून क्रिस गेलनं घरगुती मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Updated: Oct 7, 2018, 07:27 PM IST
क्रिस गेलचं शेवटच्या मॅचमध्ये शतक, 8 सिक्स मारून शानदार विदाई title=

जमैका : शेवटच्या मॅचमध्ये शतक करून क्रिस गेलनं घरगुती मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेलनं रिजनल सुपर-50 ओव्हर मॅचमध्ये जमैका स्क्रोपियन्सकडून खेळताना बारबाडोस प्राईडविरुद्ध 114 बॉलमध्ये 122 रनची खेळी केली. या शतकीय खेळीदरम्यान गेलनं 10 फोर आणि 8 सिक्स लगावल्या. लिस्ट-ए कारकिर्दीच्या 356 मॅचमध्ये गेलचं हे 27वं शतक आहे.

जमैकाकडून ही माझी शेवटची मॅच असेल असं क्रिस गेलनं याआधीच जाहीर केलं होतं. बॅटिंगसाठी मैदानात उतरल्यानंतर गेलला दोन्ही टीमच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला.

गेलच्या शतकाच्या मदतीनं जमैकानं 47.4 ओव्हरमध्ये 226 रन बनवले. बारबाडोसची टीम 193 रनवर ऑल आऊट झाली. शतक केल्यानंतर गेलनं 31 रन देऊन एक विकेटही घेतली. या कामगिरीमुळे गेलला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. जमैकासाठी शेवटच्या 50 ओव्हरच्या मॅचमध्ये शतक लगावणं आनंददायक आहे. मी नेहमी असंच काहीतरी करण्याचा विचार करायचो. टीमला विजय मिळवून देणं आणखी खास आहे, अशी प्रतिक्रिया गेलनं दिली.

सिक्सर किंग क्रिल गेल

गेलनं आत्तापर्यंत टी-20 मॅचमध्ये 846 सिक्स लगावल्या आहेत. या रेकॉर्डच्या आजूबाजूलाही कोणता खेळाडू नाही. गेलनंतर वेस्ट इंडिजच्याच कायरन पोलार्डनं 528 सिक्स लगावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये मात्र गेलच्या नावावर 103 सिक्स आहेत. न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्टीलच्या नावावरही 103 सिक्सच आहेत. 

आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये गेल आणि शाहिद आफ्रिदीच्या नावावर 476 सिक्स आहेत. यावर्षी जुलैमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडेमध्ये गेलनं 73 रनची खेळी केली होती. यामध्ये 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता.