सुरत : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्जुन सध्या विनू मंकड अंडर-19 ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुननं 5 विकेट घेतल्या. अर्जुनच्या या घातक बॉलिंगमुळे गुजरातची टीम 142 रनवर ऑल आऊट झाली.
अर्जुन तेंडुलकरनं दत्तेश शाह(0), प्रियेश (1), एलएम कोचर(8), जयमीत पटेल (26) आणि ध्रुवांग पटेल(6) यांच्या विकेट घेतल्या. मुंबईकडून खेळताना अर्जुननं 8.2 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 5 विकेट घेतल्या. यामुळे मुंबईनं गुजरातवर 9 विकेटनं विजय मिळवला. गुजरातनं मुंबईला विजयासाठी 143 रनचं आव्हान दिलं. यानंतर मुंबईचे ओपनर सुवेन पारकरनं नाबाद 67 आणि दिव्यांचनं 45 रन करून पहिल्या विकेटसाठी 108 रनची पार्टनरशीप केली. मुंबईची पुढची ग्रुप मॅच बंगालबरोबर आहे. यानंतर मंगळवारी मुंबईचा सामना मध्य प्रदेशविरुद्ध होईल.
श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 यूथ टेस्टमध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी निराशाजनक झाली होती. पहिल्या मॅचमध्ये अर्जुननं दोन्ही इनिंगमध्ये 65 रन देऊन 2 विकेट घेतल्या. बॅटिंग करताना अर्जुन शून्य रनवर आऊट झाला होता. दुसऱ्या मॅचमध्ये अर्जुननं दोन इनिंगमध्ये 72 रन देऊन 1 विकेट घेतली. या मॅचमध्ये अर्जुननं 14 रनची खेळी केली.
अनेकवेळा अर्जुन तेंडुलकर भारतीय टीमसोबत बॉलिंगचा सराव करताना दिसला आहे. भारत इंग्लंड दौऱ्यावर असताना अर्जुन तेंडुलकरनं भारतीय बॅट्समनना सराव दिला. याआधी ऑक्टोबर 2017 साली न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्येही अर्जुननं भारतीय टीमसोबत सराव केला. मागच्या वर्षी आयसीसी महिला वर्ल्ड कपदरम्यान अर्जुननं भारतीय महिला टीमलाही सराव दिला.
अंडर-19 कूच बिहार ट्रॉफी इंटर स्टेट क्रिकेटमध्येही अर्जुननं उल्लेखनीय कामगिरी केली होती. रेल्वेविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुननं 11 ओव्हरमध्ये 44 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. यामुळे मुंबईनं मॅच इनिंग आणि 103 रननं जिंकली होती. आसामविरुद्धची मॅचही मुंबई अर्जुनच्या कामगिरीमुळे इनिंग आणि 154 रननी जिंकली. दुसऱ्या इनिंगमध्ये अर्जुननं 15 ओव्हरमध्ये 44 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. एक महिन्याआधी अर्जुननं मध्य प्रदेशविरुद्ध याच स्पर्धेत 5 विकेट घेतल्या.